
Indira Gandhi International Airport
नवी दिल्ली : इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल 1 वरचं छत कोसळून अपघात झाला. यामध्ये सहा जण जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. या घटनेनंतर लगेचच सर्वांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण यामध्ये काही गाड्या छताखाली अडकल्याचे सांगण्यात आले.
दिल्लीत संततधार पाऊस सुरु असतानाच इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या T-1 च्या छताचा काही भाग अचानक खाली पडला. त्यामुळे तिथे उभ्या असलेल्या कार-टॅक्सी चालकांना त्याचा फटका बसला. या घटनेची माहिती पोलीस, रुग्णवाहिका व अग्निशमन विभागाला देण्यात आली. त्यांनी तातडीने धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, दिल्ली विमानतळावर छत कोसळल्याच्या घटनेसंदर्भातील एक व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेनं शेअर केला आहे. तसेच काही फोटो, व्हिडिओही समोर आले असून, छत कोसळल्यामुळे त्याखाली दबल्या गेलेल्या गाड्यांची काय दुरावस्था झाली आहे, त्याचे विदारक दृश्य त्यामध्ये दिसत आहे.
विमानतळावरील टर्मिनल 1 वरून सर्व उड्डाणे रद्द
दिल्लीत सध्या मुसळधार पाऊस होत आहे. या पावसामुळे सध्या दिल्ली विमानतळ अंशतः बंद ठेवण्यात आलेलं आहे. दिल्ली विमानतळावरील टर्मिनल 1 वरून सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. विमानतळ प्राधिकरणाकडून तशापद्धतीची माहितीही प्रावाशांना दिली जात आहे.