Arvind Sawant apologizes after controversial statement
मुंबई : विधानसभा निवडणुकीमुळे राज्याचे राजकारण रंगले आहे. मतदानाला अवघे 15 दिवस बाकी राहिल्यामुळे जोरदार तयारी केली जात आहे. सर्व राजकीय पक्ष प्रचाराला लागले आहेत. प्रचार सभा व बैठका वाढल्या आहेत. प्रचारावेळी नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. पण त्याचबरोबर महिला नेत्यांवर देखील खालच्या पातळीवर टीका केली जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी शायना एन. सी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले.
शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाच्या शायना एन. सी यांच्याविरोधात अपशब्द वापरल्याचा दावा केला जात होता. याप्रकरणी शायना एन. सी यांनी अरविंद सावंत यांच्याविरोधात तक्रारही दाखल केली होती. त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला. यानंतर आता अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच इतर काही नेत्यांची नाव घेऊन त्यांच्या वक्तव्याची आठवण करुन दिली आहे. मुंबदेवी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमिन पटेल यांचा प्रचारवेळी त्यांनी टीका केली होत. इथे इम्पॉर्टेड चालत नाही, ओरिजनल माल चालतो असं वक्तव्य केलं. या वक्तव्यावरून जोरदार टीका कऱण्यात आली. शायना एन. सी यांनी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली. आता अरविंद सावंत यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
हे देखील वाचा : लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे कधी येणार? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितले
काय म्हणाले अरविंद सावंत?
पत्रकार परिषद घेत अरविंद सावंत यांनी त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. अरविंद सावंत म्हणाले की, “माझं वक्तव्य असन्मानजनक असेल तर या सरवांनी केलेली वक्तव्ये तुम्हाला सन्मान देणारी वाटतात का? कोणाच्याही भावना दुखाव्यात, कोणत्याही भगिनीचा अवमान व्हावा असं माझ्या आयुष्यात मी कधी काही केलं नाही. मी कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो.” असे म्हणत अरविंद सावंत यांनी दिलगिरी व्यक्त केली.
हे देखील वाचा : एकनाथ शिंदे संकुचित मनाचा नेता…माहिम मतदारसंघावरुन मनसे आक्रमक
तसेच महायुतीच्या इतर नेत्यांनी केलेले वक्तव्य आणि महिला नेत्यांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या नेत्यांची नावं घेतली. अरविंद सावंत म्हणाले की, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा उल्लेख आशिष शेलारांनी केला होता. त्यांच्यावर कोणतीही तक्रारी केली नव्हती. ठाण्यातही एकनाथ शिंदेंच्या पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने बलात्कार केला. पण त्याविरोधातही गुन्हा दाखल झाला नाही. वामन म्हात्रेंवर गुन्हा दाखल झाला का? संजय राठोडसारखा व्यक्ती तुमच्यासमोर आहे. राम कदम, गुलाबराव पाटील यांच्याविरोधात काय गुन्हे दाखल झाले, असा सवाल करत अरविंद सावंत यांनी इतर नेत्यांची नाव घेतली आहेत.