Ashish Shelar's demand to support Amit Thackeray from Mahim constituency
ठाणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. मनसेने देखील यंदाच्या विधानसभेमध्ये पूर्ण तयारीने उतरण्याचा निर्णय घेतला आहे. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर झाली आहे. पहिल्यांदाच अमित ठाकरे हे थेट निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आहेत. माहिम मतदारसंघातून अमित ठाकरे यांना मनसेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र या मतदारसंघातून आता महायुतीने उमेदवार जाहीर केला असला तरी अमित ठाकरे यांना पूर्ण पाठिंबा द्यावा अशी मागणी आता भाजपकडून केली जात आहे.
अमित ठाकरे हे पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढणार आहेत. माहिममधून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून मनसैनिकांमध्ये अनोखा उत्साह दिसून येत आहे. या मतदारसंघामध्ये महायुतीकडून शिंदे गटाला जागा देण्यात आली आहे. शिंदे गटाने माहिम मतदारसंघामध्ये सदा सरवणकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र लोकसभेमध्ये भाजपला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेचे अमित ठाकरे यांना विधानसभेला बिनविरोध निवडणून द्यावे, अशी मागणी मुंबई शहराध्यक्ष आशिष शेलार यांनी केली आहे.
माध्यमांशी संवाद साधताना भाजप नेते व मुंबई शहराध्यक्ष आशिष शेलार यांनी अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्याबाबत मत व्यक्त केले आहे. आशिष शेलार म्हणाले की, “अमित ठाकरे यांना समर्थन देण्याची भूमिका घेतली पाहिजे, असं मला वाटतं. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी मी बोलणार आहे. ते यासंदर्भात निर्णय घेतील. यात महायुतीमध्ये कोणताही मतभेद नसला तरी यामुळे एक वेगळ्या पद्धतीचे महाराष्ट्राच्या संस्कृतीला एका अर्थाने जपता येईल असं नातं आपण दाखवलं पाहिजे. सदा सरवणकर यांच्या उमेदवारीला आमचा विरोध नाही. ते महायुतीचे उमेदवार आहेत, महायुती म्हणून निर्णय करावा हे माझं म्हणणं आहे”, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
हे देखील वाचा : सोलापूर दक्षिणमध्ये काँग्रेसचे दिलीप मानेंची सिंहगर्जना; महाविकास आघाडीत पेच निर्माण
शिंदे गटाच्या नेत्याची प्रतिक्रिया
आशिष शेलार यांच्या या मागणीवर शिंदे गटाच्या नेत्यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सामंत म्हणाले की, “आशिष शेलार यांची भूमिका ही भारतीय जनता पक्षाची असू शकते. मात्र, यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे चर्चा करतील. कारण हा मोठा विषय आहे. राज ठाकरे यांचे चिरंजीव हे निवडणूक लढवत आहेत. त्याबाबत काय करायचं?याचा निर्णय हे महायुतीचे नेते चर्चा करून घेतील. त्याबाबत मी बोलणं योग्य नाही,” असे मत शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी व्यक्त केले आहे.