भाजप नेत्या चित्रा वाघ यांची कर्नाटकच्या 'गृहलक्ष्मी'वर जोरदार टीका
मुंबई : महाराष्ट्रातील महायुती सरकारची लाडकी बहिण योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक आदर्श योजना ठरली आहे. याच्या तुलनेत, कर्नाटकातील काँग्रेस सरकारने सुरू केलेली गृहलक्ष्मी योजना एका घरातील फक्त एका महिलेलाच लाभ देण्याच्या मर्यादेमुळे टीकेचा विषय ठरली आहे, असे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सांगितले.
संबंधित बातम्या : ‘महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायचे असेल तर…’; आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचं मोठं विधान
चित्रा वाघ यांनी यासंदर्भात बोलताना महत्त्वाचा मुद्दा मांडला. ‘गृहलक्ष्मी योजनेत एका कुटुंबातील फक्त एका महिलेला लाभ दिला जातो. सासू, सून आणि नणंद यांच्यापैकी एकालाच या योजनेचा फायदा मिळतो, ज्यामुळे कुटुंबात वाद आणि स्पर्धा निर्माण होते. याच्या उलट, महाराष्ट्राची लाडकी बहिण योजना घरातील सर्व पात्र महिलांना लाभ देते. एखाद्या कुटुंबात तीन पिढ्यांच्या महिला असल्या तरी प्रत्येक महिलेला स्वतंत्र लाभ दिला जातो, ज्यामुळे आर्थिक स्थैर्यासोबतच घरात सौहार्दही टिकून राहते, असे त्या म्हणाल्या.
समतेच्या माध्यमातून सक्षमीकरण
लाडकी बहिण योजनेचा लाभ महाराष्ट्रातील दोन कोटींहून अधिक महिलांनी घेतला आहे. एका घरातील एकापेक्षा जास्त महिलांना लाभ देऊन ही योजना महिलांच्या विविध गरजा पूर्ण करते. यामुळे महिलांना आत्मनिर्भरता मिळते आणि निर्णय घेण्याचा आत्मविश्वासही वाढतो, असे त्यांनी सांगितले.
कर्नाटक सरकारच्या धोरणावर टीका
कर्नाटकातील काँग्रेस सरकारची गृहलक्ष्मी योजना एका कुटुंबातील फक्त एका महिलेला लाभ देते. यामुळे मोठ्या कुटुंबांतील इतर महिलांच्या गरजांकडे दुर्लक्ष होते. तसेच, हा मर्यादित दृष्टिकोन महिलांच्या सक्षमीकरणाला बाधा पोहोचवतो, असे टीकाकारांचे मत आहे.
महिलांसाठी महायुती सरकारची बांधिलकी
चित्रा वाघ यांनी महाराष्ट्रातील महिलांना लाडकी बहिण योजनेच्या महत्त्वाची जाणीव करून देत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. “काँग्रेस सत्तेत आल्यास कर्नाटकाप्रमाणे एका घरातील फक्त एका महिलेला लाभ दिला जाईल,” असे त्यांनी सांगितले. निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहिण योजना महिलांना समानतेच्या आधारे सक्षमीकरणाचा संदेश देते आणि महायुती सरकारची महिलांप्रती असलेली वचनबद्धता अधोरेखित करते.
वाद-विवाद व स्पर्धा निर्माण करण्याचीच ही काँग्रेसची योजना
कर्नाटकमधील काँग्रेसच्या महिला व बालविकास मंत्री स्वतः कबूल करतात की, कर्नाटकात गृहलक्ष्मी योजना (लाडकी बहिण योजनेसारखी) यात काँग्रेस एका ‘कुटुंबातील फक्त एकाच महिलेला’ लाभ देतंय. म्हणजे सासू,सून आणि नणंद पैकी एकालाच लाभ द्यायचा आणि कुटुंबातील महिलांमधे वाद विवाद व स्पर्धा निर्माण करण्याचीच ही काँग्रेसची योजना असल्याची टीका वाघ यांनी केली.
हेदेखील वाचा : हजारो स्क्वेअर फुटांवर पसरलय कलेचं अनोखं विश्व! जगातील सर्वात मोठ्या आणि अनोख्या संग्रहालयांबद्दल जाणून घ्या