Gopal Tiwari
पुणे : ‘महाराष्ट्राची अस्मिता पायदळी तुडवणाऱ्यांना, राज्यास दिवाळखोर करुन, भ्रष्टाचारावर पांघरूण घालणाऱ्या ‘महा(भ्रष्ट)युती’स सत्तेवरून खाली खेचा’, असे पुण्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी सांगितले. तसेच सार्वजनिक आरोग्य सुविधांच्या, रखडलेल्या ‘डीपी’च्या नियोजनबद्ध अंमलबजावणीसाठी महाविकास आघाडी उमेदवारांना ‘निर्णायक उच्चांकी मतांनी’ विजयी करा, असे आवाहनही त्यांनी केले.
हेदेखील वाचा : मविआचं सरकार आलं तर रोहित पवारांना मिळणार ही जबाबदारी: शरद पवारांनी कर्जतच्या सभेत जाहीरच करून टाकलं
वारंवार होणाऱ्या ‘वाहतूक कोंडीतून’ पुणेकरांची कायमस्वरुपी सुटका होणे गरजेचे आहे. त्यासाठी वर्षानुवर्षे अस्तित्वात असलेल्या ‘त्याच व तेवढ्याच रुदींच्या रस्त्यांचे व रस्त्यालगत पार्किंगचे नियोजन करणे ही पुणे शहरातील वास्तवतेची व काळाची गरज आहे. वर्षानुवर्षे सतत केवळ व केवळ ‘संभाव्य व नियोजित रस्तारुंदी’ ग्राह्य धरून व मेट्रोचा एफएसआयची उधळण करून बेधुंद बांधकाम परवानग्या देणे, हा शुद्ध मूर्खपणा असून, प्राप्त परिस्थितीत वाहतूक दळणवळणाच्या संकल्पनेला छेद देणारा, अनावस्था व अनागोंदी निर्माण करणारा ‘अनियंत्रित विकास’ असल्याची प्रखर टीका त्यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, ‘शहरातील अस्तित्वातील रस्त्या लगतच्या ‘रहिवासी व व्यावसायिक’ बहुमजली उच्चांकी उंचीच्या प्रकल्पांमधील, किमान १० ते १५ टक्के वाहने दिवसा (कार्यालयीन वेळेत) जरी बाहेर पडली तर वारंवार वाहतूक कोंडी होते ही वास्तवता नजरेआड करता येणार नाही. त्यामुळे अस्तित्वातील बांधकामांना पुरेशी दळण-वळण, वाहतूक व पार्किंग व्यवस्था निर्माण होईपर्यंत तातडीने स्थगिती देऊन बांधकामे नियंत्रणाखाली आणणे गरजेचे आहे. यासाठी राज्य पातळीवर शहर नियोजनाचे फेरधोरण आखणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
नदीपात्र सुशोभिकरणाच्या नावाखाली, नागरी पैसा उधळून, कामे करत असल्याचे सोंग आणणे ही पुणेकरांच्या डोळ्यात निव्वळ धूळफेक आहे. मनपाचे हजारो कोटी ‘बँकांचे अस्तित्व जपण्यासाठी’ डिपॅाझिट्समध्ये ठेऊन पुणेकरांना विकासापासून वंचित ठेवणे, ही सत्ताधाऱ्यांची जनतेप्रती प्रतारणा चालली आहे. या सर्व गैरप्रकारांना मुठमाती देण्यासाठी स्वच्छ सुंदर व पर्यावरणपूरक, वाहतूक व्यवस्थेचे पुणे शहर उभारण्यासाठी महाविकास आघाडीच्याच उमेदवारांना निर्णायक उच्चांकी मतांनी विजयी करा, असे आवाहनही त्यांनी केले.
हेदेखील वाचा : Rahul Gandhi : पंतप्रधान मोदींच्या ‘एक है तो सेफ है’ वरुन राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल