Haryana Assembly elections 2024 next Chief Minister of haryana
चंदीगड : हरयाणा विधानसभा निवडणूकाचा रणसंग्राम आता संपला आहे. काल (दि.05) रोजी मतदान पार पडले. त्यानंतर आता एक्झिट पोलचे निकाल समोर आले आहेत. येत्या 8 तारखेला निकाल लागणार असून त्यापूर्वी उमेदवार नेत्यांमध्ये धाकधुक सुरु आहे. हरयाणा विधानसभा निवडणूकीमध्ये कॉंग्रेसने भाजपला जोरदार टक्कर दिली आहे. मागील दहा वर्षांपासून हरयाणामध्ये भाजपची सत्ता होती. यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपची हॅटट्रीक करण्याची संधी आहे. यासाठी भाजपने देखील जोरदार प्रयत्न केले आहेत. मात्र एक्झिट पोलचे निकाल कॉंग्रेसच्या बाजूने झुकताना दिसत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री पदावरुन रस्सीखेच सुरु असल्याचे दिसत आहे.
हरयाणा विधानसभा निवडणूक ही एकचा टप्प्यामध्ये झाली. 90 जागांसाठी झालेल्या या निवडणूकीमध्ये भाजप विरुद्ध कॉंग्रेस ही प्रमुख लढाई होती. मतदानानंतर ध्रुव रिसर्चच्या एक्झिट पोलनुसार, इंडिया आघाडीला 57 जागा आणि एनडीए आघाडीला 27 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच इतर पक्षांना 0 ते 6 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कॉंग्रेस मोठा विजय मिळवण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र हरयाणामध्ये एक्झिट पोलमधून दिसत आहे. त्यामुळे आता अनेक बड्या आणि प्रमुख नेत्यांकडून मुख्यमंत्रिपदावर दावा सांगितला जात आहे. राजकीय वर्तुळामध्ये याबाबत जोरदार चर्चा देखील सुरु आहे.
भूपिंदरसिंग हुडा
हरयाणा विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदासाठी भूपिंदरसिंग हुडा हे यादीमध्ये वरच्या स्थानावर आहेत. भाजप सरकारवेळी भूपिंदर सिंग हुड्डा यांनी विरोधी पक्षनेते म्हणून कार्यभार सांभाळला आहे. याशिवाय 2005 ते 2014 या काळात ते दोनदा मुख्यमंत्रीही राहिले आहेत. मुख्यमंत्रीपदाचा दावा मांडताना ते म्हणाले होते की, “मी अजून निवृत्त झालो नाही. राज्यात फक्त काँग्रेसच सरकार स्थापन करेल. याशिवाय मुख्यमंत्री कोण होणार हे फक्त पक्षाचे हायकमांडच ठरवेल. ” असे मत हुड्डा यांनी व्यक्त केले आहे.
कुमारी शैलजा
या यादीमध्ये दुसरे नाव आहे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या (AICC) सरचिटणीस आणि सिरसाच्या खासदार कुमारी शैलजा यांचे. एक प्रमुख दलित चेहरा असण्यासोबतच ते गांधी घराण्याच्या खूप जवळच्या आहेत. मुख्यमंत्रिपदाबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, “काँग्रेस माझा अनुभव आणि पक्षाप्रती असलेली माझी निर्विवाद निष्ठा नाकारू शकत नाही. मी काँग्रेसची एकनिष्ठ सैनिक आहे आणि कायम राहणार आहे. काँग्रेसमध्ये मुख्यमंत्र्यांबाबत निर्णय हा पक्ष घेतो, हे सर्वांना माहीत आहे.”
रणदीप सिंग सुरजेवाला
हरयाणाचा पुढचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण याबाबत रणदीप सिंग सुरजेवाला यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरु आहे, आपल्या कैथल मतदारसंघामध्ये मतदान केल्यानंतर, राज्यसभा खासदार आणि एआयसीसीचे सरचिटणीस रणदीप सिंग सुरजेवाला म्हणाले की, “मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणे चुकीचे नाही. राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य आहे.
उदय भान
हरियाणा काँग्रेसचे प्रमुख आणि दलित नेते उदय भान हे देखील मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारांपैकी एक आहेत. ते भूपिंदर सिंग हुड्डा यांच्या जवळचे मानले जातात. दिल्लीमध्ये AICC नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी राज्यात दलित चेहरा समोर ठेवण्याबाबत बोलले जात होते. त्यामुळे उदय भान यांच्या देखील महत्त्वकांशा वाढल्या आहेत.
दीपेंद्र हुडा
भूपिंदरसिंग हुड्डा हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले तर ते आपल्या मुलाचे नाव दीपेंद्र हुड्डा यांचेही नाव पुढे करू शकतात, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात आहे. मुख्यमंत्री पदाबाबत ते म्हणाले होते की, “कुमारी शैलजा यांच्या म्हणण्यात काहीही चुकीचे नाही. यासाठी काँग्रेसमध्ये प्रक्रिया सुरू आहे. पक्षाला बहुमत मिळवून सरकार स्थापन करणे हे पहिले प्राधान्य आहे. नावाबाबत मुख्यमंत्र्यांचा पक्ष म्हणजे हायकमांड स्तरावर एक बैठक घेतली जाते ज्यामध्ये निवडून आलेल्या आमदारांचा सल्ला घेतला जातो आणि अंतिम निर्णय पक्षाच्या हाय कमांडद्वारे घेतला जातो.