फोटो सौजन्य- iStock
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी मतदान सकाळी 7 वाजता सुरू होईल आणि सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया चालू राहील. मतदान केंद्रावर रांगेत असलेले सर्व मतदार मतदान पूर्ण होईपर्यंत मतदान करू शकतील. यासाठी निवडणूक यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे, आणि 2 लाख 21 हजार 60 बॅलेट युनिट्स वापरण्यात येणार आहेत. यंत्रणेची तयारी झाली आहे आता आपण मतदानाचा हक्क बजावण्याची वेळ आली आहे. तरी सर्वांनी या लोकशाहीच्या उत्सवात सामील होऊया.
निवडणुकीसाठी राज्यात सुमारे 9.7 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 5 कोटी 22 लाख 73 हजार 739 पुरुष मतदार, 4 कोटी 69 लाख 96 हजार 279 महिला मतदार, आणि 6 हजार 101 तृतीयपंथी मतदार आहेत. पुणे जिल्हा मतदारसंख्येत आघाडीवर आहे. राज्यात एकूण 4.69 कोटी महिला मतदार असून रत्नागिरी, नंदुरबार, गोंदिया, भंडारा आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आहे.
दिव्यांग (PwD) मतदारांची संख्या 6 लाख 41 हजार 425 आहे, तर सेना दलातील (Service Voters) मतदारांची संख्या 1 लाख 16 हजार 170 आहे. यावर्षी एकूण 4,136 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये 3,771 पुरुष, 363 महिला, आणि 2 इतर उमेदवार आहेत.
निवडणुकीसाठी ईव्हीएमची व्यवस्था प्रचंड प्रमाणावर केली आहे. 1 लाख 186 मुख्य मतदान केंद्रे आणि 241 सहायक मतदान केंद्रांची व्यवस्था केली आहे. राज्यभर 1 लाख 427 मतदान केंद्र स्थापित करण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 8,462 मतदान केंद्रे आहेत, त्यानंतर मुंबई उपनगर 7,579, ठाणे 6,955, नाशिक 4,922, आणि नागपूर 4,631 मतदान केंद्रे आहेत.
राज्यात 185 विधानसभा मतदारसंघांसाठी एक बॅलेट युनिट, 100 मतदारसंघांसाठी दोन बॅलेट युनिट्स, आणि तीन मतदारसंघांसाठी तीन बॅलेट युनिट्स लागणार आहेत. यावर्षी मतदान केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आली आहे, त्यामुळे मतदारांची गैरसोय टाळता येईल आणि सुलभ मतदानाची प्रक्रिया सुनिश्चित होईल.
राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी सुसज्ज तयारी केली असून, मतदान प्रक्रिया पारदर्शक आणि शांततापूर्ण पद्धतीने पार पडेल, अशी अपेक्षा आहे.
राज्यात मतदारांच्या संख्येच्या प्रमाणात मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यात आली आहे. एकूण 1,00,186 मतदान केंद्रे स्थापित करण्यात आली असून, त्यात शहरी भागात 42,604 आणि ग्रामीण भागात 57,582 मतदान केंद्रे आहेत. शहरी भागातील मतदारांची अनास्था दूर करण्यासाठी पुणे, मुंबई, ठाणे यासारख्या शहरांमध्ये अतिउंच इमारती आणि सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या संकुलात 1,181 मतदान केंद्रे उभारली आहेत. झोपडपट्टी भागात 210 मतदान केंद्रे ठेवण्यात आली आहेत.
याव्यतिरिक्त, आदिवासी आणि दुर्गम भागातील मतदारांसाठी विशेष सुविधा दिल्या गेल्या आहेत. गडचिरोली, गोंदिया, नंदुरबार, धुळे, आणि अमरावती जिल्ह्यात आदिवासी आणि दुर्गम भागांसाठी मतदान केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आली आहे. सहाय्यक मतदान केंद्रांची एकूण संख्या 241 आहे. या उपाययोजनांमुळे सर्व मतदारांना सोयीचे मतदान करण्यास मदत होईल.
केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी ४२६ महिला नियंत्रित मतदान केंद्रे स्थापण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकमध्ये ४५, जळगावमध्ये ३३, गोंदियामध्ये ३२, सोलापूरमध्ये २९ आणि मुंबई उपनगरमध्ये २६ महिला नियंत्रित केंद्रे असतील. वाशिम, सिंधुदुर्ग, गडचिरोली, हिंगोलीमध्ये प्रत्येकी तीन महिला नियंत्रित केंद्रे असतील.