PM Narendra modi in dhule speech for vidhansabha elections
धुळे : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रातील नेते दौऱ्यावर आले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. त्यांच्या राज्यातील विविध भागांमध्ये प्रचार सभा पार पडत आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांची पहिली प्रचार धुळे विधानसभा मतदारसंघामध्ये पार पडली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. आरक्षण, लाडकी बहीण योजना अशा अनेक मुद्द्यांवरुन पंतप्रधान मोदींनी टीकास्त्र डागलं.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी लढा उभा केल्यामुळे हा मुद्दा प्रकर्षाने समोर आला आहे. यावरुन नरेंद्र मोदी यांनी भाष्य करत गांधी परिवारावर टीका केली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी दलित, मागासवर्गीय समाजास आरक्षण मिळू नये, यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आरक्षणासाठी मोठी लढाई लढावी लागली. त्यानंतर इंदिरा गांधी यांनीही एससी, एसटी यांना आरक्षण मिळू नये, यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर राजीव गांधी यांनी ओबीसी आरक्षण मिळू नये, असे काम केले. आता त्या परिवारातील युवराज आरक्षणच्या विरोधात आहे. ते आता देशातील ओबीसींना छोट्या छोट्या जातींमध्ये वाटण्याचा प्रयत्न करत आहे. कॉंग्रेसने यापूर्वी देखील धर्माच्या नावावर कट रचला आहे. आता काँग्रेस जातीच्या नावावर फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्याला एकजुट राहून काँग्रेसचा खेळ उधळून लावायचा आहे, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधक असलेल्या महाविकास आघाडीवर निशाणा साधला. “महाविकास आघाडीच्या गाडीला ना चाक आहेत ना ब्रेक आहे. चालकाच्या सीटसाठीही तिन्ही पक्षात रस्सीखेच सुरू आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार केला. राज्यातील जनतेने त्यांचं अडीच वर्षांचे शासन बघितलं आहे. आधी त्यांनी सरकार लुटले, नंतर जनतेला लुटलं. त्यांनी मेट्रो प्रकल्प बंद केले, वाढवण बंदराचं काम थांबवण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. तसेच समृद्धी महामार्गाला विरोध केला, अशा नेत्यांपासून आता महाराष्ट्रातील जनतेने सावध होण्याची गरज आहे,” असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.
हे देखील वाचा : ‘भाजप आमदार सदाभाऊ खोत यांना सत्तेची मस्ती’; युवक काँग्रेसचा घणाघात
जम्मू काश्मीरमधील मुद्द्यावर देखील नरेंद्र मोदी यांनी भाष्य केले. सध्या नवीन स्थापन झालेल्या जम्मू काश्मीर विधानसभेमध्ये कलम 370 वरुन जोरदार वादंग निर्माण झाला आहे. या राड्यामुळे काश्मीरकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावर भाष्य करताना मोदी म्हणाले की, ” देशाच्या स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधींना काँग्रेसचे विसर्जन करण्याचे होते. काँग्रेस नेहमी देशाला तोडण्याचे कटाचा भाग राहिला आहे. त्याचे सर्वात मोठे उदाहरण जम्मू-काश्मीर आहे. काँग्रेसने 75 वर्षांपर्यंत बाबासाहेब आंबेडकर यांची राज्यघटना जम्मू-काश्मीरमध्ये लागू होऊ दिले नाही. देशात दोन राज्यघटना होत्या. परंतु मोदी आला आणि त्यांनी देशाची राज्यघटना काश्मीरमध्ये लागू केली. आता पुन्हा जम्मू-काश्मीरमध्ये कट करु लागले आहे. त्यांच्या आघाडीने कलम 370 लागू करण्याचा प्रस्ताव समंत केला आहे. देशात आता कोणीही कलम 370 पुन्हा लागू करु शकणार नाही,” असा घणाघात नरेंद्र मोदी यांनी केला.