ऐन विधानसभा निवडणुकीत 'प्रहार'च्या उमेदवाराची कारच पेटवली; कारण...
यवतमाळ : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचे वातावरण आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारीही केली जात आहे. त्यातच यवतमाळ विधानसभा मतदारसंघात प्रहार जनशक्ती पक्षाकडून निवडणूक लढवत असलेले बिपीन चौधरी यांची घरासमोर लावलेली कार काही अज्ञातांनी पेटवून दिली. ही घटना मध्यरात्रीच्या दरम्यान झाल्याचे समोर आले आहे.
हेदेखील वाचा : ‘सरकार बदलण्याची आता वेळ आली, कर्तृत्त्ववान माणसांच्या हाती सरकार द्यायचंय’; शरद पवारांचं मतदारांना आवाहन
यवतमाळ विधानसभा मतदारसंघात हजारो कुणबी-मराठा मतदार आहेत. तरीही एकाही बड्या राजकीय पक्षाने समाजाला प्रतिनिधित्व दिले नाही. त्यामुळे या समाजात नाराजी आहे. कुणबी मराठा समाजाच्या वतीने नुकतेच बिपीन चौधरी यांच्यासाठी सहविचार सभेचे आयोजन केले होते. या सभेत चौधरी यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय समाजबांधवांनी घेतला. त्यांच्या कुणबी समाजातील वाढत्या प्रभावामुळे अनेकांनी धास्ती घेतली असून, दबाव निर्माण करण्याच्या उद्देशाने हे कृत्य केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
याप्रकरणी अवधूतवाडी पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला आहे. कुणबी समाजाच्या वाढत्या पाठिंब्यामुळे विचलित होऊन कुणीतरी राजकीय द्वेषातून कार पेटविल्याचा संशय व्यक्त केला जात असून, आपण माघार घेणार नसल्याचे स्पष्टीकरण बिपीन चौधरी यांनी सांगितले.
आगीमुळे कार पूर्णत: जळून खाक
यवतमाळच्या गुरुकृपा नगरीमध्ये बिपीन चौधरी हे वास्तव्यास आहेत. शुक्रवारी रात्री अडीचच्या सुमारास अज्ञातांनी त्यांची महिंद्रा केयूव्ही 100 ही कार पेटवून दिली. कार पेटवल्याचे लक्षात येते तोपर्यंत वेळ निघून गेली होती. आगीमुळे कार पूर्णत: जळून खाक झाली.
वंचितकडून अपक्ष उमेदवाराला फासले काळे
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवाराला काळे फासत मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वंचितला पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराने भाजपला पाठिंबा दिल्याने वंचितचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
वंचितचे कार्यकर्ते आक्रमक
अपक्ष उमेदवार सचिन भीमराव चव्हाण यांनी सुरुवातीला वंचित बहुजन आघाडीला विधानसभा निवडणुकीसाठी पाठिंबा जाहीर केला होता. मात्र, त्यांनी हा पाठिंबा काढून घेत आता भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यांच्या या बदललेल्या भूमिकेमुळे वंचितचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यातून शैलेश कांबळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सचिन चव्हाण यांच्या तोंडाला काळे फासले.
हेदेखील वाचा : मतासाठी शपथ घेणाऱ्या उमेदवाराला मतदान न करण्याचा स्वाभिमानी जनतेचा निर्धार : समरजीतसिंह घाटगे