Supriya Sule angry over the money distribution case with Vinod Tawde
विरार : राज्यामध्ये उद्या मतदान होणार आहे. राज्याचे राजकीय भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे. प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून आता वेगळेच राजकारण रंगले आहे. भाजपचे राष्ट्रीय नेते व सरचिटणीस विनोद तावडे यांनी पैसे वाटप केल्याचा आरोप केला जात आहे. विरारमधील विवांता हॉटेलमध्ये बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना घेरले. पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत त्यांनी पाच कोटी आणल्याचे सांगितले आहे. यावरुन आता जोरदार राजकारण रंगले असून विरोधकांनी देखील टीकेची झोड उठवली आहे.
विवांता हॉटेलमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण असून बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या प्रकरणामुळे राजकारणाला वेगळे वळण मिळाले असून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मागणीनंतर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी देखील विनोद तावडे यांच्या गाडीची तपासणी केली. तसेच एक डायरी देखील हस्तगत करण्यात आली आहे.
नेत्यांसारखे आता मतदार विकत घेण्याचा प्रयत्न
या प्रकरणावर शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर निशाणा साधला आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “तुम्हाला वाटतं 50 खोके एकदम ओके, तुम्ही खोके देऊन आमदार विकत घेतले. म्हणून आता तुम्ही पैशांनी काय मतदार विकत घेणार आहात का? या देशामध्ये लोकशाही आहे. दडपशाही, भीती, पैसे या सर्व कृतींचा मी जाहीर निषेध करते. विनोद तावडे यांच्या प्रकरणाची पूर्ण चौकशी झाली पाहिजे. हे आरोप जर खरे असतील तर भाजप पक्षाने जाहीर माफी मागितली पाहिजे. तसेच विनोद तावडे यांनी राजीनामा दिला पाहिजे. आम्ही गलिच्छ राजकारण करतो ते त्यांनी मान्य करावं,” असं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “भाजपने भ्रष्टाचार संपवण्यासाठी भाजप सरकारने नोटबंदी केली. मग तरीही एवढ्या नोटा येतात कुठून? हा काळा पैसा नक्की आहे कोणाचा? विनोद तावडेंवर हा आरोप होत आहे हे अत्यंत धक्कादायक आहे. मला कधीच वाटलं नव्हतं की भाजपचे जे ओरिजिनल लोकं आहेत त्यांच्याकडून अशी होईल. देशाच्या पंतप्रधानांनी नोटबंदी केल्यानंतर एवढा पैसा कॅशमध्ये येतो कुठून याचं उत्तर त्यांनी द्यावं,” अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
त्याचबरोबर कॉंग्रेस नेते व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील महायुतीवर निशाणा साधला आहे. नाना पटोले म्हणाले आहेत की, “अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला! भाजपचे केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे विरार येथील एका हॉटेल मध्ये पैसे वाटप करताना रंगेहाथ पकडले गेल्याचा व्हिडिओ समाजमाध्यामांवर फिरत आहे. आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल निवडणूक आयोगाने विनोद तावडे यांच्यावर कडक कारवाई करायला हवी. संविधान आणि लोकशाहीचा अपमान भाजपा वेळोवेळी करत आलीये. आता बस्स झालं”, असा घणाघात नाना पटोले यांनी केला आहे.