(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Asim Riaz- Himanshi Khurana: अभिनेता आणि मॉडेल असीम रियाझ आणि त्याची माजी प्रेयसी हिमांशी खुराना यांचं नातं पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. नुकत्याच पारस छाब्राच्या पॉडकास्टमध्ये हिमांशीने त्यांच्या पूर्वीच्या नात्याबद्दल आणि धार्मिक विश्वासांमधील फरकांवर भाष्य केलं. त्यानंतर असीमने सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट शेअर करत आपली बाजू मांडली आहे.
‘मी कधीच धर्म बदलायला सांगितलं नाही’
असीमने आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केलं की, त्याने हिमांशीला कधीही धर्म बदलण्यास सांगितलं नाही. त्याने लिहिलं, “मी कोणालाही त्यांचा धर्म बदलायला कधीच सांगितले नाही. एकदाही नाही.” धर्मासारख्या संवेदनशील विषयाचा वापर आपल्याविरोधात नकारात्मकता पसरवण्यासाठी केला जात असल्याचा आरोपही त्याने केला.
असीमने पुढे म्हटलं की, वैयक्तिक विषयाला सार्वजनिक वादाचं स्वरूप देणं योग्य नाही. प्रसिद्धी किंवा व्ह्यूज मिळवण्यासाठी धर्मासारख्या संवेदनशील मुद्द्याचा वापर करू नये, असंही त्याने सुनावलं.
पारस छाब्राच्या पॉडकास्टमध्ये हिमांशीने तिच्या पूर्वीच्या नात्याबद्दल बोलताना धर्मांतराचा उल्लेख केला. मात्र, “मी याला धर्मांतर म्हणणार नाही,” असं तिने स्पष्ट केलं.
तिच्या म्हणण्यानुसार, तिच्या माजी जोडीदाराने त्याच्या धर्मातील चांगल्या गोष्टी तिच्यासोबत शेअर केल्या होत्या. त्या गोष्टी तिने समजून घ्याव्यात आणि स्वीकाराव्यात, अशी त्याची इच्छा होती. मात्र, आपण त्यासाठी सहमत नव्हती, असं हिमांशीने सांगितलं. तिने या संभाषणात असीमचं नाव घेतलं नव्हतं, मात्र तिच्या वक्तव्याचा संदर्भ त्यांच्या पूर्वीच्या नात्याशी जोडला गेला.
View this post on Instagram
करिअर आणि पैशांवरूनही असीमची टीका
असीमने आपल्या पोस्टमध्ये करिअर आणि पैशांच्या मुद्द्यावरूनही अप्रत्यक्षपणे हिमांशीवर निशाणा साधला. “माझं करिअर घडवण्यासाठी मला कधीही कोणाची गरज भासली नाही,” असं त्याने म्हटलं.
पैसा हा चारित्र्य मोजण्याचा निकष नसल्याचं सांगत त्याने प्रसिद्धी, महत्त्व किंवा काही अतिरिक्त व्ह्यूज मिळवण्यासाठी व्यक्ती कोणत्या पातळीपर्यंत जाऊ शकते, यावरून तिचं चारित्र्य दिसून येतं, असा टोला लगावला.
असीमने पॉडकास्टचा होस्ट पारस छाब्रावरही जोरदार टीका केली. दुसऱ्यांच्या आयुष्याबद्दल चर्चा करण्यापेक्षा स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष द्यावं, असा टोला त्याने पारसला लगावला. गॉसिपला व्यवसाय बनवल्याचा आरोप करत असीमने त्याच्यावर निशाणा साधला.
असीम रियाझ आणि हिमांशी खुरानाची भेट ‘बिग बॉस 13’मध्ये झाली होती. या शोदरम्यान दोघांच्या नात्याची मोठी चर्चा झाली. शो संपल्यानंतरही दोघांचं नातं कायम राहिलं. जवळपास चार वर्षे एकत्र राहिल्यानंतर 2023 मध्ये दोघांनी विभक्त झाल्याचं जाहीर केलं होतं. आता हिमांशीच्या पॉडकास्टमधील वक्तव्यानंतर असीमच्या प्रतिक्रियेमुळे त्यांचं जुनं नातं पुन्हा चर्चेत आलं आहे.






