(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Zee Marathi Awards 2026:मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय पुरस्कार सोहळ्यांपैकी एक असलेला ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२६’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंदा ‘चॅलेंज’ ही खास संकल्पना घेऊन हा सोहळा रंगणार असून, ‘पाऊल पुढे पडलंय… जमलंय!’ या प्रेरणादायी भावनेतून कलाकारांच्या जिद्दीचा, मेहनतीचा आणि यशाचा प्रवास उलगडणार आहे. दिमाखदार रेड कार्पेट एन्ट्री, लाडक्या जोड्यांचे धमाकेदार डान्स परफॉर्मन्स, खलनायकांचे हटके अंदाज आणि अनेक अनपेक्षित सरप्राइजेस यामुळे हा सोहळा प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची खास मेजवानी ठरणार आहे.
आयुष्यात प्रत्येक पाऊल पुढे टाकताना नवं आव्हान समोर येत असतं. मात्र, आपल्या माणसांची साथ, स्वतःवरचा विश्वास आणि जिद्द यांच्या जोरावर या आव्हानांवर मात करता येते. हीच आव्हानं यशाचा मार्ग दाखवतात, हा विचार यंदाच्या झी मराठी अवॉर्ड्सच्या संकल्पनेतून मांडण्यात येणार आहे.
‘पाऊल पुढे पडलंय… जमलंय!’ ही केवळ यशाची भावना नसून, प्रत्येक आव्हान स्वीकारून आत्मविश्वासाने पुढे जाण्याची प्रेरणा देणारा विचार आहे. याच भावनेतून साकार होणारा हा सोहळा कलाकारांच्या प्रवासातील खास क्षण प्रेक्षकांसमोर आणणार आहे.
रेड कार्पेटवर कलाकारांचा हटके अंदाज
या सोहळ्याची सुरुवात कलाकारांच्या दिमाखदार रेड कार्पेट एन्ट्रीने होणार आहे. आपल्या आवडत्या मालिकांमधील कलाकार खास आणि हटके पोशाखांतून सर्वांचे लक्ष वेधून घेतील. प्रत्येक पोशाखातील वेगळी कल्पना आणि आकर्षक लूक यामुळे रेड कार्पेटची रंगत आणखी वाढणार आहे.
एवढंच नाही, तर मालिकांमधील कलाकार एकमेकांना आव्हान देतानाही दिसणार आहेत. त्यामुळे कोणत्या मालिकेतील कलाकार बाजी मारणार आणि कोण ठरणार सर्वांत सरस, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहणार आहे.
Bigg Boss 20: ‘आमच्यामध्ये कधीच..’, बिग बॉस २० मध्ये ढसाढसा रडली माही विज; जय भानुशालीही झाला भावुक
लाडक्या जोड्यांचे धमाकेदार डान्स परफॉर्मन्स
प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी यंदाही मालिकांमधील लाडक्या जोड्यांचे धमाकेदार डान्स परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहेत. कमळी–ऋषी, सावली–सारंग, जान्हवी–विश्वा, भावना–सिद्धू, जय–शरू, तारिणी–केदार, समर–स्वानंदी, दीप–ज्योती आणि गौरी–शंकर या जोड्या आपल्या नृत्यातून प्रेम, मैत्री आणि नात्यांमधील गोडवा उलगडणार आहेत.
या जोड्यांची केमिस्ट्री, नृत्याची ऊर्जा आणि खास सादरीकरणं यामुळे पुरस्कार सोहळ्याला वेगळीच रंगत येणार आहे. आपल्या आवडत्या जोड्यांना एकत्र नृत्य करताना पाहण्याची संधी प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे.
झी मराठीच्या दमदार स्त्री व्यक्तिरेखा मंगळागौरीच्या पारंपरिक रंगात रंगलेल्या दिसणार आहेत. उत्साह, परंपरा आणि धमाल यांचा संगम असलेल्या या सादरीकरणात मात्र अचानक एक अनपेक्षित आव्हान समोर येणार आहे. त्यामुळे या परफॉर्मन्समध्ये पुढे काय घडणार, याची उत्सुकता निर्माण होणार आहे.
खलनायकांचा हटके अंदाज; नायकांच्या सादरीकरणातून धमाल
मालिकांमधील खलनायकांच्या खास सादरीकरणातून प्रत्येक व्यक्तिरेखेचं वेगळं रूप पाहायला मिळणार आहे. त्यांच्या हटके अंदाजामुळे आणि अनोख्या सादरीकरणामुळे मनोरंजनात नवी रंगत येणार आहे.
दुसरीकडे, नायकांच्या सादरीकरणात मुलांची उडणारी तारांबळ आणि त्यातून निर्माण होणारी धमाल प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहे. त्यामुळे नृत्य, विनोद आणि नाट्यमय सादरीकरणांचा अनुभव या सोहळ्यात मिळणार आहे.
BSF जवान कल्याणी यांचा विशेष सन्मान
‘झी मराठी अवॉर्ड्स २०२६’मधील एक अभिमानाचा क्षण म्हणजे देशसेवेत कार्यरत असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवान कल्याणी यांचा विशेष सन्मान. मालिकेतील ‘तारिणी’ या व्यक्तिरेखेची आठवण करून देणाऱ्या खऱ्या आयुष्यातील कल्याणी यांना झी मराठीच्या मंचावर आमंत्रित करून गौरवण्यात आले.
देशाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या कल्याणी यांना ‘मानाची पैठणी’ आणि दिवाळीचा फराळ भेट देऊन सन्मानित करण्यात आले. झी मराठीच्या सर्व नायिका तसेच ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ आणि हर्षदा खानविलकर यांनी एकत्र येत त्यांचा गौरव केला.
देशासाठी समर्पित भावनेने सेवा बजावणाऱ्या जवानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा खास क्षण होता. या सन्मानामुळे सोहळ्याला केवळ मनोरंजनाचीच नव्हे, तर देशसेवेबद्दल आदर आणि अभिमान व्यक्त करणारी भावनिक किनारही लाभणार आहे.
अनेक खास सादरीकरणं, कलाकारांची धमाल, नात्यांमधील गोडवा आणि प्रेरणादायी क्षणांनी सजलेला ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२६’ हा केवळ पुरस्कार सोहळा नसून आव्हानांवर मात करणाऱ्या कलाकारांच्या जिद्दीचा आणि यशाचा उत्सव ठरणार आहे.
तेव्हा आपल्या आवडत्या कलाकारांचे खास परफॉर्मन्स, रेड कार्पेटवरील हटके लूक आणि अनेक अनपेक्षित सरप्राइजेस पाहायला विसरू नका. ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२६’चा हा दिमाखदार सोहळा ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजता फक्त झी मराठीवर पाहता येणार आहे.






