
फोटो सौजन्य - Social Media
ओटीटीवरील ‘आय पॉपस्टार’ या कार्यक्रमात सादर केलेल्या ‘मन धावतंया’ या मराठी गाण्यामुळे घराघरात पोहोचलेली गायिका राधिका भिडे आता छोट्या पडद्यावर झळकणार आहे. या गाण्याने केवळ मराठी प्रेक्षकच नव्हे, तर हिंदी परीक्षकांनाही भुरळ घातली होती. याच यशानंतर राधिकाला नवी ओळख मिळाली आणि ती प्रकाशझोतात आली.
आता राधिका झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘सावळ्याची जणू सावली’ मध्ये विशेष भूमिकेत दिसणार आहे. सध्या मालिकेत सावलीच्या आवाजाचं सत्य उघड झालं असून मेहेंदळे कुटुंब तिच्या पाठीशी ठामपणे उभं राहिल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दुसरीकडे, भैरवीला सावलीने ठाम शब्दांत इशारा दिल्याने कथेला नवं वळण मिळालं आहे. आता ते वळण काय आहे? आणि सावली आणि मेहंदळे कुटुंबीय त्या वळणाला कसे सामोरे जातील? या गोष्टी पाहणे मजेशीर ठरणार आहेत.
झी मराठीनं शेअर केलेल्या नव्या प्रोमोमध्ये सावली तिचं पहिलं गाणं रेकॉर्ड करताना दिसते. रेकॉर्डिंग रूममध्ये सावली, तिलोत्तमा आणि सारंग यांच्यासोबत अचानक राधिका भिडेची एन्ट्री होते. राधिकाला पाहताच सावलीच्या चेहऱ्यावर आनंद झळकतो. “माझं पहिलंच गाणं तेही राधिका मॅडमसोबत,” असं म्हणत सावलीचा आनंद प्रेक्षकांना भावतो.
मात्र, याच क्षणी कथेत ट्विस्ट येतो. गाणं रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीला भैरवीचा फोन येतो आणि सावलीचं गाणं बिघडवण्याचा कट आखला जातो. त्यामुळे सावलीचं स्वप्न पूर्ण होणार की पुन्हा अडथळा निर्माण होणार, याची उत्सुकता वाढली आहे. राधिका भिडेच्या या एन्ट्रीमुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत असून सोशल मीडियावर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हा खास भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून राधिका छोट्या पडद्यावर कशी छाप पाडते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
राधिकाच्या या Entry ने नक्कीच सावल्याची जणू सावली मालिकेच्या TRP मध्ये वाढ दिसून येईल, तसेच राधिका अभिनय कसे करेल? आणि अभिनय क्षेत्रात तिचे पुढील प्रकल्प काय असतील? याकडे प्रेक्षकांचे लक्ष राहणार आहे.