
फोटो सौजन्य - Social Media
रविकांता फिल्म्स निर्मित आणि अकात डिस्ट्रीब्यूशन प्रस्तुत ‘मिशन मुंबई’ या आगामी मराठी ॲक्शन चित्रपटाचा पोस्टर अनावरण सोहळा नुकताच मुंबईतील Bandra येथे उत्साहात पार पडला. या सोहळ्याला चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार, तंत्रज्ञ तसेच मान्यवर उपस्थित होते. मराठी चित्रपटसृष्टीत सध्या विविध विषयांवर प्रयोग होत असताना ॲक्शनपटांची कमतरता जाणवत होती. ही पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न ‘मिशन मुंबई’ या चित्रपटातून करण्यात आला असल्याची चर्चा सध्या चित्रपटवर्तुळात रंगत आहे.
दक्षिण भारतीय आणि बॉलिवूड चित्रपटांप्रमाणेच ॲक्शन चित्रपटांची क्रेझ आता मराठी सिनेमातही पाहायला मिळणार असल्याचे या चित्रपटाच्या टीमने सांगितले. मुंबईतील बॉम्बस्फोट आणि शहरात आणण्यात आलेल्या आरडीएक्सच्या पार्श्वभूमीवर आधारित असलेली ही कथा प्रेक्षकांना थरारक अनुभव देणारी असल्याचे सांगितले जात आहे. ॲक्शन, थरार आणि नाट्यमय घडामोडींचा संगम असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना वेगळा अनुभव देईल, असा विश्वास चित्रपटाच्या निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.
या चित्रपटात प्रमुख भूमिकेत सुप्रसिद्ध अभिनेता Ajay Sharma दिसणार असून त्यांच्यासोबत ज्येष्ठ अभिनेते Vijay Patkar आणि Anand Jog हे महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत. तसेच अभिनेत्री Surekha Kudchi यांच्यासह ओम राणे, संकेत मोरे, प्रशांत कराड, सिद्धेश आचरेकर, शांती बावकर, अश्विनी तेंडुलकर, विपुल भोईर, राहुल कानाडोल, लक्ष्मी निवृत्ती पंधे आणि किरण चव्हाण हे कलाकारही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे कलाकारांची मोठी फळी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
‘मिशन मुंबई’ या चित्रपटाचे दिग्दर्शन Kailash Pawar आणि Chandrakant Vispute यांनी केले आहे. या चित्रपटाची कथा देखील चंद्रकांत विसपुते यांची असून पटकथा आणि संवाद लेखन मच्छिंद्र कदम यांनी केले आहे. चित्रपटातील दृश्य अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी छायाचित्रणाची जबाबदारी नंदलाल चौधरी यांनी सांभाळली आहे. चित्रपटातील ॲक्शन दृश्ये हा या सिनेमाचा मुख्य आकर्षणाचा भाग असणार आहे. यासाठी फाईट मास्टर Fayyaz Sayyed यांनी ॲक्शन सीक्वेन्सची आखणी केली आहे. तसेच संगीताची जबाबदारी समीर खोले यांनी सांभाळली असून चित्रपटाच्या मेकअपची धुरा किशोरजी पिंगळे यांनी सांभाळली आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्याही हा चित्रपट प्रभावी ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पोस्टर अनावरण सोहळ्याला सुप्रसिद्ध अभिनेता अजॉय शर्मा, ओम राणे, संकेत मोरे, प्रशांत कराड, सिद्धेश आचरेकर, शांती बावकर, अश्विनी तेंडुलकर, विपुल भोईर, राहुल कानाडोल, लक्ष्मी निवृत्ती पंधे, किरण चव्हाण तसेच दिग्दर्शक कैलाश पवार, चंद्रकांत विसपुते आणि दिग्दर्शक शिरीष राणे उपस्थित होते. या कार्यक्रमात चित्रपटाबद्दल कलाकारांनी आपले अनुभवही शेअर केले. दरम्यान, ‘मिशन मुंबई’ चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित होताच त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पोस्टरमधील ॲक्शनचा अंदाज आणि चित्रपटाचा विषय पाहता प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. सध्या सोशल मीडियावर या पोस्टरची जोरदार चर्चा सुरू असून चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे निर्मात्यांनी सांगितले. मराठी चित्रपटसृष्टीत एक दमदार ॲक्शनपट म्हणून ‘मिशन मुंबई’ कडे पाहिले जात आहे.