( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Yashvardhan Ahuja-Jamie Lever: सेलिब्रिटींचे बनावट AI फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. अनेक सेलिब्रिटींना याचा सामना करावा लागला आहे. आता अभिनेता गोविंदाचा मुलगा यशवर्धन आहुजा आणि ज्येष्ठ अभिनेते जॉनी लिव्हर यांची मुलगी जेमी लिव्हर यांच्याबाबतही अशीच एक अफवा सोशल मीडियावर पसरली आहे. दोघांचं लग्न झाल्याचा दावा करणारे काही बनावट AI व्हिडीओ व्हायरल झाले. अखेर जेमीने स्वतः या प्रकरणावर प्रतिक्रिया देत सत्य स्पष्ट केलं आहे.
जेमी लिव्हरने इन्स्टाग्रामवर ‘फेक वेडिंग न्यूज’ नावाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून तिने तिच्या लग्नाबाबत पसरत असलेल्या अफवांवर भाष्य केलं.
जेमी म्हणाली, “मी माझ्या खोट्या लग्नाचे बनावट AI व्हिडीओ पाहत आहे. सुरुवातीला मला खूप हसू येत होतं. पण आता मला खूप फोन येत आहेत.”
या अफवांमुळे परिस्थिती विचित्र झाल्याचं सांगताना तिने मिश्कील अंदाजात म्हटलं की, खरे लग्नाचे प्रस्तावही आता येणं बंद झालं आहे.
View this post on Instagram
जेमीने व्हिडीओमध्ये यशवर्धन आहुजाचं नाव थेट घेतलेलं नाही. मात्र, ज्या व्यक्तीसोबत तिच्या लग्नाची अफवा पसरवली जात आहे, तो तिच्यासाठी लहान भावासारखा असल्याचं तिने स्पष्ट केलं.
ती म्हणाली, “ज्या व्यक्तीसोबत माझ्या लग्नाची खोटी बातमी पसरवली जात आहे, तो माझ्यासाठी लहान भावासारखा आहे. आम्ही एकत्र एका चित्रपटात कामही करत आहोत.”
त्यामुळे जेमी आणि यशवर्धन यांच्या लग्नाच्या चर्चांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं अभिनेत्रीच्या स्पष्टीकरणातून स्पष्ट होत आहे.
AI तंत्रज्ञानाचा वापर करून बनावट व्हिडीओ तयार करणाऱ्यांना जेमीने थेट आवाहन केलं आहे. “कृपया असे निरर्थक व्हिडीओ बनवू नका. हे खरंच खूप वाईट आहे,” असं तिने म्हटलं.
सोशल मीडियावर एखादी गोष्ट व्हायरल होताच ती खरी मानली जाते. त्यामुळे अशा बनावट AI कंटेंटमुळे निर्माण होणाऱ्या गैरसमजांबाबत जेमीने नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, यशवर्धन आहुजा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तो ‘हीरो की हीरोईन’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवणार असल्याची माहिती आहे.
या चित्रपटात नितंशी गोयल, सुनीता आहुजा, जेमी लिव्हर, चंकी पांडे, बृजेंद्र काला आणि सिमरत कौर रंधावा यांच्याही भूमिका आहेत. त्यामुळे यशवर्धन आणि जेमी लिव्हर आगामी चित्रपटात एकत्र काम करताना दिसणार आहेत.






