toll plaza
नवी दिल्ली : महामार्गांवरून वाहने जाताना-येताना टोल कंपन्यांकडून टोलची आकारणी (Toll Plaza Rate) केली जाते. आता याच टोलच्या दरात लोकसभा निवडणूक संपताच वाढ करण्यात आली आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अनेक राज्यांमधील टोल दर जाहीर केले आहेत. हे सर्व दर सोमवारपासून लागू होतील, असेही सांगण्यात आले आहे.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात ‘एनएचआयए’ने 1 एप्रिलपासून टोलचे दर वाढवले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीमुळे यावर्षी 1 एप्रिलपासून ही टोल दर वाढ लागू झाली नाही. त्यानंतर आता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने टोल दर वाढवण्याचा आदेश जारी केला आहे. टोलचे दर वाढवण्याची परवानगीही मुख्य कार्यालयाकडून मिळाली आहे. याशिवाय, रस्ते आणि वाहतूक मंत्रालयानेही टोल दरात वाढ करण्याच्या प्रस्तावालाही मान्यता दिली. त्यामुळे आता टोलदरात वाढ होणार हे निश्चित झाले आहे.
3-5 टक्के दरवाढ होणार
यापूर्वी टोल दरवाढ जाहीर केली होती. मात्र, लागू करण्यात आली नव्हती. त्यानंतर आता तब्बल दोन महिन्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील सुमारे 1100 टोल प्लाझावर टोल दरात सोमवारपासून 3 ते 5 टक्क्यांनी वाढ केली जाणार आहे. याचा फटका अनेक वाहनाचालकांना बसणार आहे.