नवी दिल्ली : संसदेत तीन तरुणांनी घुसखोरी करत स्मोक कँडल फोडले होते. ही घटना ताजी असतानाच पुन्हा दिल्लीत एका तरुणाने बनावट ओळखपत्रासह गृहमंत्रालयाच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. सध्या त्या तरुणास पोलिसांनी अटक केली असून, त्याची चौकशी सुरू आहे. गृहमंत्रालयाची सुरक्षा भंग करण्याचा एका तरुणाचा प्रयत्न दिल्ली पोलिसांनी हाणून पाडला.
दिल्ली पोलिसांनी बनावट ओळखपत्रासह त्यास अटक केली. आदित्य प्रताप सिंग असे आरोपीचे नाव आहे. आदित्य सिंग कोणत्या उद्देशाने बनावट ओळखपत्रासह गृह मंत्रालयाच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, अद्याप या घुसखोरीमागील मुख्य उद्देश समोर आला नाही हे विशेष. दहशतवादी संबंधाचा शोध दिल्लीतील नॉर्थ ब्लॉकमध्ये असलेल्या गृहमंत्रालयाच्या कार्यालयात बनावट ओळखपत्राद्वारे घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली.
सध्या त्याची चौकशी केली जात असून, या घुसखोरी मागे दहशतवादाची किनार आहे का? या बाजुनेही तपास केला जात असल्याची माहिती सध्या पुढे येत आहे. दरम्यान घुसखोरी करणारा तरुण हा कुणाची तरी फसवणूक करण्याच्या उद्देशाने गृहमंत्रालयाच्या कार्यालयात शिरल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.