Immersion of four lakh gold chain with ganapati
बेंगळुरू : राज्यामध्ये सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम आहे. त्याचबरोबर देशातील विविध भागांमध्ये देखील गणरायाचे स्वागत करण्यात आले आहे. गणपती बाप्पा काहींकडे 10 दिवस विराजमान होत असतो. मात्र काही जणांकडे गौरीबरोबरच गणरायाला देखील निरोप दिला जातो.काल (दि.11) पाच दिवसीय गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. बेंगळुरूमध्ये एक वेगळीच घटना घडली आहे. गणपती बाप्पाचे विसर्जन करताना तब्बल चार लाख रुपयांच्या सोन्याच्या साखळीचे देखील विसर्जन झाले. ६० ग्रॅमच्या सोन्याच्या साखळीसह गणपती बाप्पाचे विसर्जन केल्याची घटना घडली आहे.
बेंगळुरूमध्ये ही घटना घडली आहे. एका कुटुंबाने मोठ्या उत्साहात घरी गणपती बसवला होता. पाच दिवसांनी गणपची बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. यावेळी कुटुंबाने गणपतीच्या सजावटीसाठी तब्बल चार लाख रुपयांची ६० ग्रॅम सोन्याची साखळी आणली होती. या चार लाख रुपयांच्या सोन्याच्या साखळीने गणेश मूर्तीची सजावट त्यांनी केली होती. यानंतर पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. मात्र, गणपतीचे विसर्जन करत असताना हे कुटुंबीय ती साखळी काढण्यास विसरले आणि त्यांनी गणेश मूर्तीचे विसर्जन केले. गणपती विसर्जनानंतर साखळी काढण्यास विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि मोठा गोंधळ निर्माण झाला.
गणरायासोबत 4 लाख किंमतीची सोन्याची चेन विसर्जित करण्यात आल्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर लगेचच साखळीचा शोध सुरु करण्यात आला. गणपतीचे विसर्जन केले त्याठिकाणी साखळीचा शोध घेण्यासाठी ते कुटुंबीय पोहोचलं. मात्र, संबंधित ठेकेदाराने पाणी उपसण्यास नकार दिला. त्यानंतर त्या कुटुंबाने पोलिसांत धाव घेतली. यानंतर प्रशासनाच्या मदतीने साखळीचा शोध घेण्यास सुरुवात झाली. तब्बल 10 तास हे कुटुंबीय साखळीचा शोध घेत होते. या साखळीच्या शोधासाठी 10 हजार लिटर पाण्याचा उपसा करण्यात आला. अगदी कंत्राटदाराने आपल्या मुलांना देखील साखळी शोधण्यासाठी कामाला लावलं होतं. त्यानंतर अखेर ही साखळी सापडली. आणि बेंगळुरूच्या गोविंदराजनगर येथील या कुटुंबीयांनी सर्वांचे धन्यवाद मानले.