Bihar Election 2025:
Bihar Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. पण त्याचवेळी निवडणुकांची घोषणा कधी होणार, याची उत्सुक्ताही शिगेला पोहचली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे निवडणूक आयोगानेही त्यांची तयारी पूर्ण केल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची भाष्य केलं आहे. “बिहार विधानसभेची मुदत २२ नोव्हेंबर रोजी संपत असल्याने, बिहार विधानसभेच्या निवडणुका २२ नोव्हेंबरपूर्वी पूर्ण होतील. बिहारप्रमाणेच संपूर्ण देशभरात निवडणुकीप्रमाणेच एसआयआर प्रक्रिया राबण्यात येईल, असंही आयोगाने म्हटलं आहे
मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की, ‘या निवडणुकीसाठी आयोगाने सुरू केलेल्या नवीन उपक्रमांची अंमलबजावणी भविष्यात देशभरात केली जाईल. बिहारमध्ये एकूण २४३ विधानसभेच्या जागा आहेत आणि निवडणुका वेळेवर होतील. संपूर्ण निवडणूक आयोगाची टीम दोन दिवसांपासून बिहारमध्ये सक्रिय आहे. या काळात, टीमने पटना येथे राजकीय पक्ष, प्रशासकीय निवडणूक अधिकारी, उच्च राज्य प्रशासकीय अधिकारी, अंमलबजावणी संस्था, मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ), विशेष पोलिस नोडल अधिकारी (एसपीएनओ) आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (सीएपीएफ) नोडल अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या जेणेकरून निवडणुकीची संपूर्ण तयारी सुनिश्चित होईल.
निवडणूक आयोगाने सांगितले की, आता कोणत्याही मतदान केंद्रावर १२०० पेक्षा जास्त मतदार राहणार नाहीत. या व्यवस्थेमुळे मतदान प्रक्रिया आणि सुरक्षा दोन्ही प्रक्रिया सुधारतील. बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) आता मतदारांशी थेट संपर्क साधू शकतील, मतदारांची ओळख पटवण्यासाठी त्यांना ओळखपत्रे देण्यात आली आहेत. शिवाय, मोबाईल फोन जमा करून मतदान करण्याची सुविधा देखील सुरू करण्यात आली आहे, ज्यामुळे मतदारांना मतदान केंद्रावर त्यांचे मोबाईल फोन आणण्यापासून रोखले जाईल.
मुख्य निवडणूक आयुक्तांनी घोषणा केली की बिहारमध्ये एक-स्टॉप डिजिटल प्लॅटफॉर्म लागू केला जाईल. प्रत्येक उमेदवार आता मतदान केंद्रापासून १०० मीटर अंतरावर आपला एजंट तैनात करू शकतो. सर्व मतदान केंद्रांवर १००% वेबकास्टिंग होईल. काळ्या आणि पांढऱ्या मतपत्रिकांऐवजी, ईव्हीएममध्ये आता रंगीत फोटो आणि अनुक्रमांक असलेले मतपत्रके असतील, ज्यामुळे उमेदवारांची ओळख पटवणे सोपे होईल आणि मतदान प्रक्रियेत पारदर्शकता सुनिश्चित होईल.
लग्नानंतर महिलांसाठी नवीन मतदार कार्ड; गुन्हेगारांच्या पात्रतेवर आयोगाचा निर्णय
लग्नानंतर महिलांचे नाव किंवा पत्ता बदलल्यास, अशा प्रकरणांमध्ये सुधारित नोंदींसह नवीन मतदार कार्ड जारी केले जाईल, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
तुरुंगात असलेल्या गुन्हेगारांबाबत संविधानाच्या कलम ३२६ नुसार, संसदेने पारित केलेल्या कायद्यानुसार दोषी ठरलेला कोणताही गुन्हेगार जर किरकोळ गुन्हा केलेला असेल, तर तो निवडणूक लढवू शकतो. मात्र, गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरलेल्यांना निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवले जाते. निवडणूक आयोग या कायदेशीर निकषांच्या आधारे पात्रता निश्चित करतो, असे ज्ञानेश कुमार यांनी स्पष्ट केले. या उत्तरानंतर मुख्य निवडणूक आयुक्तांची पत्रकार परिषद संपली.