Vice President : सी. पी. राधाकृष्णन आज घेणार देशाच्या उपराष्ट्रपतिपदाची शपथ; राष्ट्रपती भवनात पार पडणार सोहळा
नवी दिल्ली : देशाच्या उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.९) निवडणूक झाली. यामध्ये सत्ताधारी एनडीए आघाडीच्या सी. पी. राधाकृष्णन यांचा विजय झाला असून, विरोधी इंडिया आघाडीच्या माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव झाला. त्यानंतर आज सी. पी. राधाकृष्णन हे उपराष्ट्रपतिपदाची शपथ घेतील. राष्ट्रपती भवनात सकाळी दहा वाजता आयोजित समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या राधाकृष्णन यांना शपथ देतील.
एनडीएचे उमेदवार राधाकृष्णन यांनी इंडिया अलायन्सचे उमेदवार माजी न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांचा 152 मतांनी पराभव करून उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक जिंकली. 21 जुलै रोजी जगदीप धनखड यांच्या अचानक राजीनाम्यानंतर, 9 सप्टेंबर रोजी नवीन उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक झाली. त्यात राधाकृष्णन यांची निवड झाली. त्यानंतर आता उपराष्ट्रपतिपदावर निवड झाल्यानंतर राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला आहे. ही माहिती गुरुवारी राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या निवेदनात देण्यात आली.
दरम्यान, राधाकृष्णन यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रपती मुर्मू यांनी महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे सोपवला आहे. देवव्रत आता दोन्ही राज्यांच्या राज्यपालपदाची जबाबदारी स्वीकारतील.
जगदीप धनखड यांनी दिला अचानक राजीनामा
जगदीप धनखड यांच्या अचानक राजीनाम्यानंतर मध्यावधी निवडणुका झाल्या
संसदेच्या अलिकडच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान, जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिला. मात्र, त्यांचा कार्यकाळ दोन वर्षे शिल्लक होता. तत्पूर्वी त्यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे मध्यावधी निवडणुका झाल्या.
भाजपकडून झाले होते खासदार
राधाकृष्णन यांनी १९९८ आणि १९९९ मध्ये कोइम्बतूर मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक भाजपच्या तिकिटावर जिंकली होती. अवघ्या १६ व्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचा संबंध आला. १९७४ मध्ये त्यांची भारतीय जनसंघाच्या राज्य कार्यकारी समितीवर नियुक्ती झाली. याशिवाय ते महाराष्ट्र, झारखंड आणि तेलंगणात राज्यपालपदाची जबाबदारी पार पाडली आहे.