दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहेत. एनडीए घटक पक्षांच्या साथीने एनडीएचे सरकार स्थापन केले जाणार आहे. यंदा भाजपला बहुमताचा आकडा गाठता आला नसला तरी जेडीयूचे नेते नीतीश कुमार व टीडीपी चंद्रबाबू नायडू यांच्या साथीने सरकार स्थापन केले जाणार आहे. काल एनडीएच्या संसदीय बैठकीमध्ये नरेंद्र मोदी यांना नेता म्हणून अनुमोदन दिले गेले आहे. त्यानंतर एनडीएकडून सरकार स्थापनेचा दावा करण्यात आला असून राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांना आमंत्रण देण्यात आले आहे. यानंतर राजधानी दिल्लीमध्ये जोरदार तयारी केली जात असून राजधानी दिल्ली नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी सज्ज होत आहे.
दिल्लीमध्ये कलम 144 लागू
येत्या रविवारी म्हणजे उद्या दिनांक 9 जून रोजी नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. तिसऱ्यांदा मोदी सरकार स्थापन होत असल्यामुळे भाजपकडून जोरदार तयारी केली जात आहे. राष्ट्रपती भवनामध्ये शपथविधीसोहळ्याच्या कार्यक्रमाची तयारी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर राजधानीमध्ये घडामोडींना वेग आला आहे. दिल्लीमध्ये कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. संपूर्ण राजधानीला सुरक्षा दलाकडून हायअलर्ट मागवण्यात आले आहे. दिल्लीमध्ये शपथविधी सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्यामुळे बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दिल्लीमध्ये नो फ्लाईंग झोन म्हणून घोषित करण्यात आली आहे. ड्रोन उडवणे, पॅराग्लायडिंग करणे यावरही बंदी आहे. 9 आणि 10 जून रोजी दिल्लीमध्ये कलम 144 लागू करण्यात आले असून राष्ट्रपती भवनाच्या सुरक्षेसाठी प्रचंड वाढ करण्यात आली आहे.
दिल्लीत त्रिस्तरीय सुरक्षा
राष्ट्रपती भवनाच्या सुरक्षेसाठी निमलष्करी दलाच्या 5 तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत. एनएसजी कमांडो, ड्रोन आणि स्नायपर तैनात केले जातील. परिसरातील उंड इमारतीवर अँटी ड्रोन सिस्टीमही तैनात करण्यात आली आहे. एनएसजीकडे उपलब्ध असलेली ड्रोनविरोधी यंत्रणा शपथविधी सोहळ्यादरम्यान तैनात केली जाईल. एनएसजीच्या मदतीने, डीआरडीओ अँटी ड्रोन सिस्टीमवरही नजर ठेवत आहे. सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्यासाठी, घुसखोरी चेतावणी प्रणाली (Intrusion Warning System) आणि फेस आयडेंटिफिकेशन एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. तसेच गुप्त जागा आणि उंच इमारतींवर स्नायपर तैनात करण्यात येणार आहेत. या शपथविधी समारंभासाठी दक्षिण आशियाई असोसिएशन फॉर रीजनल कोऑपरेशन सदस्य देशांतील मान्यवरांना आमंत्रित केल्यामुळे राष्ट्रीय राजधानी ‘हाय अलर्ट’वर असेल. सोहळ्याच्या दिवशी राष्ट्रपती भवन आणि विविध महत्त्वाच्या ठिकाणी दिल्ली पोलिसांचे SWAT आणि NSG कमांडो तैनात असतील. शपथविधीसाठी दिल्लीत त्रिस्तरीय सुरक्षा (तीन स्तर) असणार आहे.
कोण राहणार उपस्थित?
नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी देशातील अनेक मान्यवरांसह परदेशातील प्रमुख लोक उपस्थित राहणार आहेत. भारताने बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू, भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ आणि सेशेल्सचे अध्यक्ष वेव्हेल रामखेलावन यांना आमंत्रित केले आहे. नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड हे देखील शपथविधीला उपस्थित राहणार आहेत. दहल रविवारपासून तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. शहरातील लीला, ताज, आयटीसी मौर्य, क्लेरिजेस आणि ओबेरॉय या हॉटेल्सना यापूर्वीच सुरक्षा पुरवण्यात आली आहे.