नवी दिल्ली : दिल्लीतील ग्राहक आयोगाने फॅशन बँड लाईफस्टाईल इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडला ग्राहकाला पूर्वसूचना न देता कागदी कॅरी बॅगसाठी (Carry Bag Issue) 7 रुपये आकारल्याबद्दल 3,000 रुपये दंड भरण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोग (पूर्व दिल्ली) एका किरकोळ विक्रेत्याने कागदी कॅरी बॅगच्या बदल्यात 7 रुपये आकारल्याबद्दल सेवांमध्ये कमतरता असल्याचा दावा करणाऱ्या तक्रारीच्या संदर्भात सुनावणी करत होते.
आयोगाचे अध्यक्ष एस. एस. मल्होत्रा, सदस्य रश्मी बन्सल आणि रवी कुमार यांनी सांगितले की, प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी घातल्यानंतर किरकोळ विक्रेते कागदी कॅरीबॅगसाठी शुल्क आकारत आहेत कारण प्लास्टिकच्या पिशव्यांपेक्षा कागदी पिशव्या महाग आहेत.
फॅशन बँडला दणका
आयोगाने आपल्या नुकत्याच दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, आयोगासमोरील प्रश्न प्लास्टिक पिशव्या किंवा कागदी पिशव्या वापरण्याबाबत नसून ग्राहकांना पूर्वसूचना न देता खरेदीसाठी निवडलेल्या वस्तूंचे पेमेंट करताना कॅरीबॅग पुरवण्याच्या मुद्याचा आहे. आदेशात म्हटले आहे की, तक्रारदाराने छायाचित्रे दाखल करून आपले प्रकरण स्थापित केले आहे.