

कौटुंबिक वादाच्या चौकशीसाठी आरोपीला बोलावलेले
दुचाकी पळवून आरोपी फरार
पोलीस ठाण्यातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न
Delhi Jama Masjid : दिल्लीतील मध्यवर्ती भागातील जामा मशिद पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावलेल्या एका तरुणाने पाच पोलिस कर्मचाऱ्यांवर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात पाच पोलीस कर्मचारी जखमी झाले असून, त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे.
हल्ल्यानंतर आरोपीने दुचाकी पळवून घटनास्थळावरून पलायन केले. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून काही किलोमीटर अंतरावर त्याला पकडले. यावेळी आरोपीने पुन्हा पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी गोळीबार केला. यात आरोपीच्या पायाला गोळी लागली आहे.
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी सुमारे 2.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. नबील (वय 25) याला आई आणि बहिणीशी संबंधित कौटुंबिक वादाच्या प्रकरणात चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. त्यावेळी त्याने अचानक पोलिस कर्मचाऱ्यांवर चाकूने हल्ला केला.
या हल्ल्यात दोन पोलीस उपनिरीक्षक, एक सहायक पोलीस उपनिरीक्षक आणि दोन हेड कॉन्स्टेबल जखमी झाले. त्यांच्या चेहऱ्यावर आणि मानेवर जखमा झाल्या आहेत. जखमींना सुरुवातीला संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी सर गंगाराम रुग्णालयात हलवण्यात आले. तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांवर हल्ला केल्यानंतर नबीलने एक दुचाकी पळवली आणि पोलीस ठाण्यातून फरार झाला. मध्य जिल्हा ऑपरेशन युनिटच्या पथकाने त्याचा पाठलाग सुरू केला. काही किलोमीटर अंतरावर चितली कबर परिसरात तो आढळला. त्याला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले.
अटकेच्या प्रयत्नादरम्यान आरोपीने पुन्हा पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. यात त्याच्या पायाला गोळी लागली. त्यानंतर त्याला उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, नबीलचा यापूर्वीही चाकूहल्ल्याच्या घटनांशी संबंधित गुन्हेगारी इतिहास आहे.
या घटनेमुळे पोलीस ठाण्यात चौकशीसाठी येणाऱ्या व्यक्तींची तपासणी आणि शस्त्रांची तपासणी करण्याच्या व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलीस ठाण्यातच चाकूने हल्ला झाल्याने सुरक्षेतील त्रुटींचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
विशेष म्हणजे, दिल्लीचे पोलीस आयुक्त अनुराग कुमार यांनी जामा मशिद पोलीस ठाण्याजवळील हौज काजी पोलीस ठाण्याला भेट दिल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत ही घटना घडली. शनिवारी ते जनसुनावणीसाठी पोलीस ठाण्यात गेले होते. या वेळी त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या तक्रारी आणि समस्या जाणून घेतल्या होत्या.
अतिक्रमण, वाहतूक कोंडी तसेच स्थानिक नागरी सुविधांशी संबंधित विविध मुद्द्यांवर या जनसुनावणीत चर्चा झाली. नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण करण्याचे निर्देश पोलीस आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले होते. तसेच महापालिका आणि अन्य संबंधित विभागांच्या अखत्यारीतील प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्याशी समन्वय साधण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या होत्या.