'प्रसूतीनंतर ९० दिवसांनी समजलं, पोटात अजून काहीतरी आहे'; पाहून डॉक्टरही चक्रावले
एका जिवंत तरुणाला डॉक्टारांनी मृत घोषित केल्याची घटना ताजी असताना एका गर्भवती महिलेसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटनाही राजस्थानमधीलच असून प्रसूतीनंतर महिलेच्या पोटात टॉवेल राहिला. तब्बल ९० दिवस त्या महिलेलाही याची जाणिव झाली नाही. अखेर डॉक्टरांचा हा निष्काळजीपणा समोर आला असून कोर्टाने चौकशीचे आदेश दिले आहेत.
मेडिकडल संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
राजस्थानमधील जोधपूरमध्ये कुचामन येथील सरकारी रुग्णालयात एक महिला प्रसूतीसाठी दाखल झाली होती. सिजेरियनची गरज भासल्यामुळे डॉक्टरांनी महिलेवर शस्त्रक्रीया केली. मात्र यादरम्यान डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा कळस पहायला मिळाला. डॉक्टरांनी टाके घातले पण शस्त्रक्रीयेदरम्यान वापरण्यात आलेला टॉवेल महिलेच्या पोटात राहिला. त्याचं भान डॉक्टरांच्या टीमला आलं नाही.
प्रसुती झाल्यानंतर तीन महिन्यांपासून महिलेच्या पोटात दुखायला सुरू झालं. या दरम्यान तिने अनेक डॉक्टरांकडे उपचार घेतले. पण पोटात गाठ असल्यामुळे दुखत असल्याचं दरवेळी कारण देण्यात येथ होतं. शेवटी महिला जोधपूर एम्स रुग्णालयात दाखल झाली. यावेळी तपासणी केल्यानंतर डॉक्टरही चक्रावून गेले. महिलेच्या पोटात टॉवेल दिसत होता. याची माहिती समजल्यानंतर या प्रकरणाची स्थानिक आरोग्य विभागाने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, पण पीडित महिलेने त्यावर न थांबता कोर्टात धाव घेतली आहे.
दरवेळी डॉक्टर तिला पोटात गाठीची समस्या असल्याचं सांगत होते. या सर्व घटनेची सुरुवात 1 जुलैला झाली, जेव्हा कुचामनच्या सरकारी रुग्णालयात एक युवती डिलिव्हरीसाठी आली होती. सर्जरी केल्यानंतर तिच्या पोटात सतत वेदना होत्या, ज्यासाठी तिने कुचामन आणि इतर अनेक खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेतले. मात्र, प्रत्येक वेळी तिला पोटात गाठीची समस्या सांगून घरी परत पाठवण्यात आलं होतं.
क्राईमच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
राजस्थानमध्ये हे प्रकरण चर्चेचा विषय बनला असून डीडवाना सीएमएचओने चौकशीसाठी तीन डॉक्टरांची समिती स्थापन केली आहे. जोधपूर एम्समध्ये सीटी स्कॅन आणि अल्ट्रासाउंटमध्ये महिलेच्या पोटात टॉवेल असल्याचं स्पष्ट झालं आहे. टॉवेल बरेच दिवस पोटात राहिल्यामुळे महिलेल्या आतड्यांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे तिला पुढचे काही महिने काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.