वाराणसी : तुम्ही कधी असा विचार तरी केला होतो का, की टोमॅटोच्या किमती इतक्या महागतील की टोमॅटोच्या सुरक्षेसाठी बाऊन्सर आणावे लागतील. हा विनोद नाही, हे वास्तवात घडलंय तेही उत्तर प्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत. या शहरात एका भाजी विक्रेत्यानं टोमॅटोवर (Tomato Prices Hike) लक्ष देण्यासाठी दोन बाउन्सर भाड्यानं आणलेले आहेत. महाग असलेल्या टोमॅटोंपासून ग्राहकांना दूर ठेवण्याचं काम हे 2 बाउन्सर करतायेत. जे ग्राहक टोमॅटोच्या किमतीवरुन भाजी विक्रेत्याशी वाद घातल आहेत, त्यांच्यापासूनही संरक्षण मिळवण्यासाठी या बाऊन्सरचा उपयोग करण्यात येतोय. याचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे.
भाजपा टमाटर को ‘Z PLUS’ सुरक्षा दे. pic.twitter.com/k1oGc3T5LN
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) July 9, 2023
काय आहे व्हिडिओत?
व्हिडिओत एका भाजी विक्रेत्याच्या दुकानासमोर दोन बाऊन्सर उभे असलेले दिसतायेत. ते येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला दम देताना दिसतायते. दुकानाकडे येत असलेल्या ग्राहकांना हे बाऊन्सर थांबवतायेत. तसचं टोमॅटोपासून लांब राहा, असा इशाराही ग्राहकांना देण्यात येतोय. टोमॅटोला स्पर्श करु नका, असंही या बाऊन्सर्सकडून सांगण्यात येतंय.
काय म्हणतोय भाजी विक्रेता?
टोमॅटोच्या संरक्षणासाठी बाऊन्सर हायर करणाऱ्या या भाजी विक्रेत्याचं नाव आहे अजय फौजी, त्यानं पीटीआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिलीय. टोमॅटोच्या किमती गगनाला भिडल्यामुळं बाऊन्सर हायर करावे लागल्याचं तो सांगतोय. टोमॅटो मिळवण्यासाठी ग्राहक हिंसाचारापर्यंत पोहचल्याचा दावा त्यानं केलाय. काही जण तर टोमॅटो पळवून नेत असल्याचं त्याचं म्हणणंय. दुकानात बरेच टोमॅटो आहेत आणि आम्हाला वाद नको आहेत, त्यामुळं बाऊन्सर नेमल्याचं त्यानं सांगितलंय. टोमएटोची किंमत 160 रुपये किलोपर्यंत पोहचली आहे. अनेक ग्राहक 50 ग्रॅम, 100 ग्रॅम टोमॅटो सध्या खरेदी करत असल्याचंही त्यानं सांगितलंय.
टोमॅटोच्या भावाचं राजकारणही
अजय फौजी याच्या दुकानात दोन पोस्टर्सही लावण्यात आलेत. त्यात पहिले पैसे मग टोमॅटो असा एक बॅनर आहे. तर कृपया टोमॅटो आणि मिरची यांना स्पर्श करु नका, असा दुसरा बॅनर आहे. हा व्हिडीओ सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ट्विट केला आहे. यावरुन भाजप सरकारवर त्यांनी टीका केलीय. टोमॅटोला झेड प्लस दर्जाची सुरक्षा सरकारनं द्यावी, असं लिहित त्यांनी सरकारला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केलाय.
टोमॅटोच्या किमतीनं सगळेच हैराण
टोमॅटोच्या चोरीच्या प्रमाणातही वाढ झाल्याचं सांगण्यात येतंय. कर्नाटकात एका शेतातून 3 लाखांचे टोमॅटो पळवण्यात आलेले आहेत. हास जिल्ह्यात सोमनहल्ली गावातून 90 टोमॅटोच्या पेट्या पळवण्यात आल्या आहेत. हातातोंडाशी असलेला घास गेल्यानं शेतकरी वैतागलेला आहे. देशात मॅकडॉनल्ड्सच्या अनेक आउटलेटमधून टोमॅटो गायब झालेले आहेत. आपल्या मेनुवरुन टोमॅटो हटवण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे. अनेक ठिकाणी पावसामुळं टोमॅटोच्या उत्पादनावर मोठा परिणाम झालेला आहे.