
अयोध्या – प्रभू रामाची नगरी (Prabhu Shree Ram Nagari) अशी ओळख असलेली अयोध्या (Ayodhya) नगरी ही अनेक महापुरुषांची कर्मभूमी राहिलेली आहे. ही पवित्र भूमी हिंदूंमध्ये (Hindu) महत्त्वपूर्ण मानण्यात येते. याच ठिकाणी प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला होता. हीची ओळख राम जन्मभूमी अशी आहे. याच राम जन्मभूमीवर असलेलं भव्य राम मंदिर यापूर्वी तोडण्यात आलं होतं. कोणी बांधलं होतं ते मंदिर आणि कसं होतं, हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न.
कधी झाला प्रभू रामचंद्राचा जन्म ?
इ.स. पूर्व ५११४ सालात रामाचा जन्म झाल्याचं मानण्यात येतं. तर काही जण हा कालावधी इ.सनापूर्वीही १० ते १५ हजार वर्षांपूर्वीचा आहे असंही मानतात. चैत्र महिन्यात रामनवमीच्या दिवशी मध्यान्न वेळेला प्रभू रामाचा जन्म झाला, यावर मात्र अनेकांचं एकमत आहे.
पौराणिक तथ्य काय आहेत ?
ऑगस्ट 2003 मध्ये पुरातत्व विभागानं केलेल्या सर्वेत, ज्या ठिकाणी बाबरी मशीद बांधलेली होती, त्यात जागेत पूर्वी मंदिर असल्याचं समोर आलं होतं. या मशिदीच्या भूमीच्या आत उत्खननात मंदिरांचे खांब आणि इतर अवशेष मिळाले होते. या सगळ्या सर्व्हेचा आणि उत्खननाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात आले होते. या उत्खननात भिंती, फरशा, 50 खांबांच्या आधारे उभे असलेले दोन सभामंडप समोर आले होते. तसचं याच भागात एक शिवमंदिर होते, असंही समरो आलं होतं. हा जीपीआरएस रिपोर्ट आणि भारतीय पुरातत्व विभागाचा सर्वे आता न्यायालयाच्या अखत्यारित आहे. 30 सप्टेंबर 2010 रोजी अलाहाबादच्या न्यायालयानं या ढाच्याबाबत ऐतिहासिक निर्णय दिला होता. न्यायमूर्ती धर्मवीर शर्मा, न्यायमूर्ती सुधीर अग्रवाल आणि न्यायमूर्ती एसयू खान या तिन्ही न्यायाधीशांनी ज्या ठिकाणी रामलल्ला विराजमान आहेत, ती राम जन्मभूमी असल्याचं मान्य केलं होतं.
कशी होती अयोध्या?
अयोध्या पूर्वी कौशल जनपद यांची राजधानी होती. वाल्मिकी रामायणातील बालकांडात अयोध्येचं वर्णन सापडतं. अयोध्या 12 योजन लांब आणि 3 योजन रुंद असल्याचा त्यात उल्लेख आहे. यात अयोध्येचं वर्णन सविस्तरपणे करण्यात आलेलं आहे. शरयू तटावर वसलेलं अयोध्या शहर भव्य आणि समृद्ध होतं असा उल्लेख आहे. इथं विस्तीर्ण महाल, मोठे रस्ते त्या काळी होते. बागा होत्या, रस्त्यावर मोठमोठे खांब होते. प्रत्येक घर हे राजमहालासारखं होतं. इंद्रदेवाच्या अमरावतीप्रमाणे दशरथांनी हे शहर वसवलं होतं. सजवलं होतं.
काय होती जन्मभूमीचा स्थिती ?
भगवान रामांनी जलसमाधी घेतल्यानंतर, अयोध्या काही काळासाठी उजाड झाली होती. मात्र त्यांच्या जन्मभूमीवर असलेला महाल तसाच होता. भगवान श्रीरामाचा पुत्र कुशाने राजधानी अयोध्येचे पुन:निर्माण केले. यानंतर सूर्यवंशाच्या 44 पिढ्या म्हणजे अखरेचे वंशज महाराज बृहद्वल असेपर्यंत अयोध्येचा थाट आणि या वंशाचा थाट तसाच भव्य होता. कौशलराज बृहद्वल यांचा मृत्यू महाभारतात अभिमन्यूच्या हातून झाला. या युद्धानंतर अयोध्या पुन्हा उजाड झाली. मात्र रामजन्मभूमीचे अस्तित्व टिकून होतं.
कुणी बांधलं भव्य मंदिर ?
इ.स. पूर्व १०० मध्ये उज्जैनचा चक्रवर्ती सम्राट विक्रमादित्य एक दिवशी अयोध्येत दाखल झाला. या भूमीवर त्याला काही चमत्कार अनुभवायला आले. त्यानं शोध घेतला तेव्हा योगी आणि संतांनी ही श्रीरामाची अवध भूमी असल्याचं त्याला सांगितलं. संतांच्या निर्देशानुसार सम्राटानं या ठिकाणी भव्य मंदिर बांधलं. तिथे तलाव, सरोवर आणि महालांची निर्मिती केली. काळ्या रंगांच्या दगडांची ८४ खांबांचं विशाल मंदिर सम्राट विक्रमादित्यानं बांधल्याचं सांगण्यात येतं. या मंदिराची भव्यता तेव्हा हरखून जाण्याइतकी मोठी होती.
कुणी केला जिर्णोद्धार?
विक्रमादित्यानंतर अनेक राजांनी या मंदिराची देखरेख केली. यातच शुंग वंशाचा पहिला शासक पुष्यमित्र शुंगानं या मंदिराचा जिर्णोद्धार केला. शुंगानं या ठिकाणी 2 अश्वमेध यज्ञ केल्याचा उल्लेख असलेला शिलालेख सापडल्याचंही सांगण्यात येतं. त्यानंतर गुप्तवंश चंद्रगुप्त द्वितीयपासून अनेक वर्ष अयोध्या ही गुप्त साम्राज्याची राजधानी राहिली. महाकतवी कालिदासानं याचा उल्लेख केलेला आहे.
भव्य मंदिराचे पुरावे कुणाकडे?
चिनी भिक्षू फा हियान यानं या ठिकाणी अनेक बोद्ध मठांचा रेक़ॉर्ड ठेवण्यात आल्याचं सांगितलंय. 7 व्या शताब्दीत या ठिकाणी चिनी प्रवासी हेनत्सांग या ठिकाणी आला होता. त्याने लिहिल्याप्रमाणे या ठिकाणी 20 बौद्ध मंदिरं होती. तसंच 3000 भिक्षू राहत होते. या ठिकाणी हिंदूंचं प्रमुख मंदिर होतं. तिथे हजारो लोकं येत असतं. त्याला राम मंदिर म्हणण्यात येत असे.
कधी सुरु झालं मंदिराचं पतन?
इ.स. 11 व्या शताब्दीत या ठिकाणी कन्नोजचा राजा जयचंद आला आणि त्यानं सम्राट विक्रमादित्य याचा शिलालेख उखडून फेकून दिला. आपले नाव त्यानं त्याठिकाणी लावलं. पानिपतच्या युद्धात जयचंदचा अंत झाला. त्यानंतर भारतावर आक्रमणं वाढली. आक्रमक आक्रमणांत काशी, मथुरा, अयोध्या इथं लूटपाट करण्यात आली. पुजाऱ्यांची हत्या करण्यात आली. मूर्ती तोडण्यात आल्या. मात्र 14 व्या शतकापर्यंत अयोध्येतील राममंदिर सुरक्षित होते. सिकंदर लोदीच्या कार्यकाळातही हे मंदिर उभं होतं. अखेरीस 1527-28 या काळात अयोध्येतील भव्य राम मंदिर तोडण्यात आलं. त्याजागी बाबरी ढाचा तयार करण्यात आला. मुगल साम्राज्याचा संस्थापक बाबरच्या एका सेनापतीनं बिहार अभियानाच्या काळात राम जन्मभूमीच्या जागी उभं असलेलं भव्य मंदिर तोडून मशीद उभी केली. असं सांगण्यात येतं. ही बाबरी मशीद 1992 पर्यंत अस्तित्वात होती. बाबरनाम्यानुसार 1528 साली अयोध्येच्या पडावानंतर बाबरने या ठिकाणी मशिदिचं निर्माण करण्याचे आदेश दिले होते.