'मी 2024 मध्ये लोकसभा निवडणूक लढवणार, माझी तयारीही सुरु' : मुमताज पटेल

काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल (Ahmed Patel) यांची मुलगी मुमताज पटेल (Mumtaj Patel) गुजरातमधील भरूच लोकसभा मतदारसंघातून (Bharuch Loksabha) निवडणूक लढवणार आहेत.
Mumtaj Patel
Published on: 
Updated on: 

अहमदाबाद : काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल (Ahmed Patel) यांची मुलगी मुमताज पटेल (Mumtaj Patel) गुजरातमधील भरूच लोकसभा मतदारसंघातून (Bharuch Loksabha) निवडणूक लढवणार आहेत. अहमदाबादमध्ये फिक्कीतर्फे आयोजित एका कार्यक्रमात मुमताज म्हणाल्या, 'माझे वडील मला राजकारणात येण्याच्या विरोधात होते. मात्र, मला 2024 मध्ये लोकसभा निवडणूक लढवायची आहे. त्यासाठी माझी तयारी सुरू आहे'.

तसेच कार्यक्रमात वडिलांच्या शेवटच्या दिवसांचा उल्लेख करताना मुमताज म्हणाल्या, कोविड महामारीच्या काळात एकदा वडिलांशी झालेल्या संवादात मी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हा ते म्हणाले होते की, एका महिलेसाठी निवडणूक जिंकणे सोपे नसते. या संवादानंतर आम्ही त्यांना गमावले.

४५ वर्षांपासून कर्मभूमी

मुमताज पुढे म्हणाल्या, भरूच हा माझ्या वडिलांचा 45 वर्षांपेक्षा अधिक काळापासून मतदारसंघ आहे. ते 3 वेळा लोकसभेचे खासदार होते आणि 6 पेक्षा जास्त वेळा राज्यसभेत गुजरातचे प्रतिनिधित्व केले. भरुच हे आमचे घर आहे. आमचा जन्म तिथे झाला आणि मी तेथून निवडणूक लढवणार आहे. यासाठी मी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. माझ्या वडिलांनी भरूचमध्ये प्रतिष्ठान स्थापन केले होते. त्यांच्या माध्यमातून मी आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात काम करत आहे, असेही त्यांनी सांगितले.

वडिलांच्या मतदारसंघातून लढायचंय

ज्या मतदारसंघातून माझे वडील संसदेत पोहोचले, तेथूनच मला लढायचे आहे. भरुच लोकसभा मतदारसंघ 1989 पासून भाजपच्या ताब्यात आहे. गत 35 वर्षांपासून पक्षाने ही जागा सातत्याने जिंकली आहे. येथील आदिवासी नेते मनसुख वसावा सलग सहाव्यांदा खासदार आहेत. अशा स्थितीत मुमताज भगवा बालेकिल्ला कसा भेदणार? हे पाहणे गरजेचे ठरणार आहे.