महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ; ग्राहकांना बसणार फटका, UPI सह इतर नियमही बदलले...
नवी दिल्ली : सध्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवसापासून अनेक नियमांत बदल केला जात आहे. त्यातच आता ऑक्टोबर महिना आजपासून सुरू झाला आहे. नवीन महिना नवीन बदल घेऊन आला. हे बदल तुमच्या खिशावर थेट परिणाम करणार आहेत. यूपीआय व्यवहार असोत, रेल्वे तिकीट बुकिंग असोत किंवा एलपीजी सिलिंडर असोत, सर्वत्र काही नवीन बदल लागू केले गेले आहेत.
ऑक्टोबरच्या सुरुवातीला रेल्वेने तिकीट बुकिंग नियमांमध्ये काही बदल केले आहेत, ज्याचा प्रवाशांना फायदा होईल. शिवाय, एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये बदल करण्यात आला असून, दरात वाढ झाली आहे. याचा तुमच्या खिशावर परिणाम होणार आहे. रेल्वे तिकीट बुकिंग नियमांमध्ये आजपासून एक नवीन बदल लागू झाला आहे. या नवीन बदलांतर्गत, ज्यांनी आधीच आधार पडताळणी केली आहे तेच आरक्षण उघडल्यानंतर पहिल्या १५ मिनिटांत तिकीट बुक करू शकतील. याशिवाय, आजपासून काही बदल लागू होत आहे. यात राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (एनपीएस) शी संबंधित नियम देखील बदलले आहेत.
हेदेखील वाचा : २० पैकी १६ जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी झाल्या, सलग ८ व्या महिन्यात महागाई झाली कमी
तसेच आजपासून यूपीआयशी संबंधित नियम देखील बदलले आहेत. तुम्ही आता यूपीआय अॅपवर कोणाकडूनही थेट पैसे मागू शकणार नाही. यूपीआयने पी२पी सुविधा बंद केली आहे. वाढत्या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर एनपीसीआयने हा निर्णय घेतला आहे. इतकेच नाही तर, तुम्ही आता यूपीआय वापरून ५ लाखांपर्यंत ट्रान्सफर करू शकता; पूर्वी ही मर्यादा १ लाख होती.
एलपीजी गॅसच्या किमती वाढल्या
दसरा आणि दिवाळीपूर्वी लोकांना महागाईचा फटका बसला आहे. दरात वाढ झाली आहे. त्यानुसार, राजधानी दिल्लीमध्ये १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत पूर्वी १५८० होती, परंतु आता त्याची किंमत १५९५.५० झाली आहे. तर १९ किलोच्या एलपीजी कमर्शियल गॅस सिलिंडरच्या किमतीत १५.५० रुपयांची वाढ झाली आहे. असे जरी असले तरी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.