निसर्गाचा प्रकोप ! वैष्णोदेवी येथे भूस्खलन तर जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; आत्तापर्यंत 30 जणांचा मृत्यू
जम्मू : गेल्या काही दिवसांपासून अनेक राज्यांत मुसळधार पाऊस होत आहे. त्यात जम्मू-काश्मीरमध्येही मुसळधार पाऊस सुरु आहे. या मुसळधार पावसाने कहर केला. या पावसाचा फटका श्री माता वैष्णोदेवी यात्रा मार्गाला बसला आहे. या मार्गावरील अर्धकुंवारी भागात भूस्खलन झाले. तर दोडा येथे ढगफुटीमुळे एकूण 30 जणांचा मृत्यू झाला.
कटरा येथे नऊ आणि दोडा येथे चार भाविकांचा मृत्यू झाला. तर यात्रा मार्गावर भूस्खलनामुळे 22 भाविक जखमी झाले आहेत. रियासीचे पोलिस अधिकारी परमवीर सिंह यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, ‘जम्मू आणि काश्मीरमधील कटरा येथील वैष्णोदेवी मंदिराजवळ मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात 30 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, जम्मूमधील चेनानी नाल्यात एक कार पडल्याने तीन भाविक वाहून गेले आहेत. बेपत्ता झालेल्या तीन भाविकांपैकी दोन भाविक राजस्थानमधील धोलपूर येथील आहेत आणि एक आग्रा येथील आहे’.
दरम्यान, रविवारपासून सुरू असलेल्या पावसामुळे जम्मूचे रस्ते आणि पूलाची दुरावस्था झाली आहे. शहरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे जम्मूचा देशाशी असलेला रस्ते आणि रेल्वे संपर्क पूर्णपणे तुटला आहे. मंगळवारी रात्री मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता, प्रशासनाने रात्री नऊनंतर लोकांना घराबाहेर पडण्यास बंदी घातली होती.
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी
देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. त्यात जम्मू आणि काश्मीरमधील दोडा येथे ढगफुटी झाली. या मुसळधार पावसात 10 पेक्षा अधिक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. दोडा जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भूस्खलन, चिखल आणि दरड पडण्याच्या घटना घडल्या. ज्यामुळे अनेक रस्ते तसेच राष्ट्रीय महामार्गाचे अनेक भाग बंद करावे लागले.
अनेक रस्ते करण्यात आले बंद
जम्मू आणि काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे जम्मू-पठाणकोट राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक बंद करण्यात आली आहे. धोक्याच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या पुलावरही वाहतूक बंद करण्यात आली आहे. पर्यायी मार्ग देखील बंद करण्यात आला आहे. वातावरण चांगले झाल्यानंतरच वाहतूक पूर्ववत केली जाईल, असे सांगण्यात आले.