

लोहगाव हवाई दल तळावर ‘नो युवर फोर्सेस’ कार्यक्रम
१३ हजार विद्यार्थ्यांनी अनुभवला हवाई कसरतींचा रोमांच
सूर्यकिरण, सारंग अन् सुखोईच्या थराराने पुणेकर मंत्रमुग्ध
Indian Air Force/ सुनयना सोनवणे: आकाशात तिरंग्याचे रंग उधळत एकमेकांना छेद देणारी सूर्यकिरणची विमाने, रंगीबेरंगी ध्रुव हेलिकॉप्टरच्या चित्तथरारक कसरती, हजारो फूट उंचीवरून तिरंगा फडकावत जमिनीवर उतरणारी ‘आकाशगंगा’ची तुकडी आणि सुखोई-३० एमकेआयच्या गर्जनेने दणाणून गेलेला परिसर......
भारतीय हवाई दलाच्या या नेत्रदीपक हवाई प्रात्यक्षिकांचा थरार शुक्रवारी पुणेकरांसह सुमारे १३ हजार शाळकरी विद्यार्थ्यांनी अनुभवला. लोहगाव येथील हवाई दल तळावर आयोजित ‘नो युवर फोर्सेस’ या विशेष कार्यक्रमाने विद्यार्थ्यांसाठी देशाच्या हवाई सामर्थ्याची रोमांचक अनुभूती दिली.
तरुणांमध्ये भारतीय सैन्यदलांविषयी आकर्षण निर्माण व्हावे, देशसेवेची भावना रुजावी आणि सशस्त्र दलांमध्ये करिअर करण्यासाठी प्रेरणा मिळावी, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुणे शहर व परिसरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. हवाई प्रात्यक्षिकांसह लढाऊ विमाने, रडार प्रणाली, संरक्षण उपकरणे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना हवाई दलाच्या कार्याची जवळून ओळख करून घेता आली.
Indian Air Force:भारतीय हवाई दलाची ताकद वाढली! HAL कडून नवीन तेजस आणि HTT-40 विमाने सुपूर्द
‘सूर्यकिरण एरोबॅटिक टीम’च्या नऊ हॉक एमके-१३२ विमानांनी डायमंड, क्लोज ट्रेल, क्रॉसओव्हर आणि लूप यांसारख्या कसरती सादर केल्या. एकमेकांच्या जवळून उड्डाण करत अचानक दिशा बदलणे, गोलाकार फेऱ्या आणि एकमेकांना छेद देत झेपावण्याच्या कसरतींनी उपस्थितांना थक्क केले. विमानांमधून निघणाऱ्या केशरी, पांढऱ्या आणि हिरव्या धुरातून आकाशात तिरंग्याची छटा उमटली. विद्यार्थ्यांचा ‘भारत माता की जय’चा जयघोष आणि टाळ्यांचा कडकडाट परिसरात दुमदुमला.
‘सारंग हेलिकॉप्टर डिस्प्ले टीम’च्या पाच स्वदेशी ‘एएलएच ध्रुव’ हेलिकॉप्टरनी डॉल्फिन लीप, वाईनग्लास आणि डायमंड फॉरमेशन सादर करत उपस्थितांचे लक्ष वेधले. हेलिकॉप्टरमधील अचूक समन्वय आणि चित्तथरारक हालचालींना प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. ‘आकाशगंगा’ स्कायडायव्हिंग टीमच्या जवानांनीही पॅराशूट प्रात्यक्षिकातून साहसाचा रोमांच निर्माण केला. सुमारे आठ हजार फूट उंचीवरून घेतलेल्या झेपेनंतर रंगीबेरंगी आणि तिरंग्याच्या रंगांतील पॅराशूटच्या साहाय्याने जवानांनी सुरक्षित उतरून उपस्थितांची मने जिंकली.
‘सुखोई-३० एमकेआय’ लढाऊ विमानाच्या प्रात्यक्षिकाने कार्यक्रमाची रंगत आणखी वाढविली. व्हर्टिकल क्लाइंब, हाय अँगल ऑफ अटॅक, बॅरल रोल आणि वेगवान दिशाबदल यांसारख्या कसरतींनी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह संचारला. विमानाच्या गर्जनेने परिसर दणाणून गेला. हवाई दलातील लढाऊ विमानांची क्षमता आणि देशाच्या हवाई संरक्षणातील त्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजून घेता आले. प्रदर्शनात विमानांची कार्यपद्धती, रडार प्रणाली, लष्करी उपकरणे, वैमानिकांचे प्रशिक्षण आणि हवाई दलातील करिअरच्या संधींबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
'आम्ही आजपर्यंत केवळ टीव्हीवर किंवा मोबाईलमध्ये लढाऊ विमाने पाहिली होती. पण आज प्रत्यक्ष डोळ्यांसमोर ‘सूर्यकिरण’ची विमाने आणि ‘सुखोई’चा थरार पाहून अंगावर काटा आला. आकाशात उमटलेले तिरंग्याचे रंग कधीच विसरता येणार नाहीत. मलाही मोठे झाल्यावर भारतीय हवाई दलात फायटर पायलट व्हायचे आहे.'
- अनुष्का मते, विद्यार्थिनी
आकाशगंगा’ टीमचे जवान इतक्या उंचीवरून तिरंगा घेऊन खाली उतरताना पाहणे हा अविस्मरणीय अनुभव होता. प्रदर्शनात विमानांची इंजिन्स, शस्त्रे आणि रडार कसे काम करतात, याची माहिती अधिकाऱ्यांनी अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितली. देशाचे रक्षण करणारे जवान किती कठीण प्रशिक्षण घेतात, हे आज जवळून समजले.”
- सार्थक गोळे, विद्यार्थी
'तरुणांमध्ये भारतीय सैन्याविषयी आकर्षण निर्माण व्हावे आणि त्यांना सशस्त्र दलांतून देशसेवेचे करिअर घडवण्याची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यातील सुमारे १३ हजार शाळकरी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. अशा उपक्रमांमुळे शाळकरी मुलांमध्ये लहानपणापासूनच देशभक्तीची भावना रुजण्यास आणि त्यांना भारतीय सैन्यदलांच्या कार्याची जवळून ओळख होण्यास निश्चितच मदत होईल.'
- एअर कमोडोर सतबीर सिंग राय, प्रमुख, लोहगाव हवाई दल तळ, पुणे
पुण्यात भारतीय हवाई दलाचा ‘नो युवर फोर्सेस’ कार्यक्रम कुठे आयोजित करण्यात आला होता?
पुण्यातील लोहगाव येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर ‘नो युवर फोर्सेस’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
‘नो युवर फोर्सेस’ कार्यक्रमात विद्यार्थ्यांना कोणती हवाई प्रात्यक्षिके पाहायला मिळाली?
या कार्यक्रमात सूर्यकिरण विमानांची प्रात्यक्षिके, ध्रुव हेलिकॉप्टरच्या कसरती, आकाशगंगा पथकाचे पॅराशूट प्रात्यक्षिक आणि सुखोई-३० एमकेआय विमानाची गर्जना अनुभवायला मिळाली.