Milk price hike : दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईत जनता होरपळून निघत आहे. त्यातच महागाईचा आणखी एक जोर का झटका बसणार आहे. पुन्हा एकदा गृहिणींचं घराचं बजेट कोलमडण्याची शक्यता आहे.
येणाऱ्या काळात दुधाच्या दरांमध्ये आणखी वाढ (Milk price hike) होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुधासाठी पु्न्हा एकदा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. याआधीही अमूल आणि मदर डेअरीने त्यांच्या दुधाच्या दरांमध्ये वाढ केलेली आहे. त्यातच आता पुन्हा एकदा दुधाचे दर वाढणार म्हणजे सर्वसामान्यांचं कंबरडं पुन्हा एकदा मोडणार आहे. देशांतर्गत वाढणारी दुधाची मागणी हे दूधदरवाढीमागे कारण असल्याचं म्हटलं जात आहे. देशात दुधाच्या मागणीमध्ये 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे या वाढत्या मागणीचा परिणाम दूध पुरवठ्यावर दिसण्याची शक्यता आहे.
एवढंच नाही तर येणाऱ्या काळात दुधाचे दर हे दिवसेंदिवस वाढतच जाण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे. यानंतर ऑक्टोबर महिन्यातही पुन्हा एकदा दुधाचे दर वाढवण्यात येऊ शकतात अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या वर्षभरात त्वचारोगामुळे सुमारे 1.89 लाख गुरं मरण पावली. हवामान, अवेळी पडणारा पाऊस, महागडा चारा आणि इतर समस्यांचाही परिणाम दूध उत्पादनावर झाल्याचं म्हटलं जात आहे.
तसं पाहता, कोविडनंतर दुधाची मागणी वाढली आहे. अशावेळी तूप, लोणी, चीजची यांची मागणीही वाढली. त्यामुळे या दूग्धजन्य पदार्थाचे दर येणाऱ्या काळात आणखी वाढणार असल्याचं म्हटलं जात आहे. दक्षिणेकडील राज्यांमधील दूध उत्पादन आणि साठवणुकीच्या आढावा घेतल्यानंतर दुग्धजन्य पदार्थांच्या आयतीत सरकार हस्तक्षेप करून पुरवठा निश्चित केला जाणार आहे. आतरराष्ट्रीय बाजारात किंमती वाढल्याने आणि अधिक दराने आयात केल्याने भाव कमी होण्याची शक्यता नाही.
सरकारच्या आकडेवारीनुसार 2021-22 मध्ये देशात 221 दशलक्ष टन दुधाचे उत्पादन झाले. गेल्यावर्षीच्या तुलनेत हे उत्पादन 6.25 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. 15 महिन्यांमध्ये देशात दुधाचे दर जवळपास 12 ते 15 टक्क्यांनी वाढले आहेत. महागाई दर सप्टेंबर 2022 मध्ये 5.5 टक्क्यांवरून फ्रेबुवारी 2023 पर्यंत 10.33 टक्यांवर गेलेला आहे. त्यामुळे दुधाचे दर ऑक्टोबर 2023पर्यंत दरवाढ कायम राहणार आहे.