Operation Sindoor new in Marathi: पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर केवळ सोळाव्या दिवशी भारताने ठोस कारवाई करत ‘ऑपरेशन सिंदूर‘च्या अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी अड्ड्यांवर जोरदार हवाई हल्ले केले. ही कारवाई भारताने बुधवारी मध्यरात्री केली असून, तिची माहिती अमेरिका, रशिया, ब्रिटनसह प्रमुख आंतरराष्ट्रीय सहयोगींना देण्यात आल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या सीमेजवळ सुमारे १०० किलोमीटरच्या परिघात असलेल्या दहशतवादी तळांना लक्ष्य करून ते नष्ट केले. या मोहिमेसाठी गुप्तचर यंत्रणांनी आधीच सखोल माहिती गोळा केली होती, ज्याच्या आधारे अत्यंत अचूक टार्गेट निवडण्यात आले. २२ एप्रिलरोजी झालेला पहलगाममधील हल्ला अत्यंत क्रूर होता. मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर सर्वसामान्यांचा बळी घेणारा हा सर्वात क्रूर हल्ला होता. टीआरएफ या दहशतवादी संघटनेने या हलल्याची जबाबदारी घेतली. टीआरएफ ही लष्कर ए तोयबाचीच एक संघटना आहे. पाकिस्तानचा या हल्ल्यातील सहभाग अगदी उघड आहे. टीआरएफ ही संयुक्त राष्ट्रांकडून बंदी घालण्यात आलेली संघटना आहे. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची ओळख पटली आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना विक्रम मिसरी म्हणाले की, दहशतवादाला प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आज भारताने बजावला आहे. लष्कर ए तोयबाकडून हा हल्ला करण्यात आला होता. पाकिस्तानने मृत घोषित केलेला दहशतवादी साजीद मीर हा पाकिस्तानातच होता. दहशतवाद रोखण्यात पाकिस्तानने कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत.
त्यांच्या नंतर कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या की, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी आज मध्यरात्री पाकिस्तानवर हल्ला केला. भारताने केलेल्या कारवाईत पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले. पाकिस्तानात गेल्या तीन दशकांपासून दहशतवादी प्रशिक्षण दिले. “पहलगाम हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरू करण्यात आले. ९ दहशतवादी तळ पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आले. ही कारवाई पहाटे १.०५ ते १.३० वाजेपर्यंत, एकूण २५ मिनिटे चालली. दहशतवादी प्रशिक्षण केंद्रे आणि लाँच पॅडवर हल्ला करून ते नष्ट करण्यात आले. या हल्ल्यात कोणत्याही प्रकारे निर्दोष नागरिकांना लक्ष्य कऱण्यात आले नाही.
मार्च २०२५ मध्ये जम्मू आणि काश्मीरमधील चार सैनिक शहीद झाले. त्याला पाकिस्तानमधील एका दहशतवादी छावणीत प्रशिक्षण देण्यात आले होते. मुंबई दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणांनाही लक्ष्य करण्यात आल्याचे सोफिया कुरेशी म्हणाल्या.