बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदान यादीसाठी विशेष सघन सुधारणा (SIR) करण्याचे काम सुरू आहे. पण यावर विरोधी इंडिया आघाडीकडून जोरदार विरोध होतआहे. त्यातच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर मतचोरीच आरोप केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यातच एसआयआरच्या माध्यमातून बिहारमधीस ६५ लाख मते कापली गेल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या मतचोरीच्या विरोधात आणि एसआयआरच्या विरोधात राहुल गांधी सध्या बिहारमध्ये वोट अधिकार यात्रा करत आहे. अशातच एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
निवडणूक आयोगाने १८ ऑगस्ट रोजी मतदार यादी जाहीर केली आणि ६५ लाख मतदारांची नावे वगळण्यात आल्याचे सांगितले. त्यानंतर बिहारमधील पटना, मधुबनी आणि पूर्व चंपारण जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक मते वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. वगळण्यात आलेल्या मतामंध्ये पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे. तसेच, १८ ते ४० वर्षे वयोगटातील मतदार हे वगळण्यात आलेल्या मतदारांपैकी एक तृतीयांशपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले आहे.
एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, पटना, मधुबनी आणि पूर्व चंपारण जिल्ह्यांमधून एकूण १०.६३ लाख नावे वगळण्यात आली आहेत, जी राज्यातील ३८ जिल्ह्यांमधील वगळण्यात आलेल्या ६५ लाख मतदारांपैकी १६.३५ टक्के इतकी आहेत. हे तीन जिल्हे बिहारमधील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चार जिल्ह्यांपैकी आहेत. या तीन जिल्ह्यांमध्ये ३६ विधानसभा जागा आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत भाजप-जेडीयू यांच्या युतीने या ३६ जागांपैकी २२ जागा जिंकल्या होत्या, तर विरोधी महाआघाडीने १४ जागा जिंकल्या होत्या.
अहवालानुसार, पटना, मधुबनी आणि पूर्व चंपारण जिल्ह्यातील ३६ जागांपैकी २५ जागा अशा आहेत जिथे मतदारांची संख्या निवडून आलेल्या उमेदवाराच्या विजयाच्या फरकापेक्षा जास्त आहे. एनडीए युतीकडे या २५ जागांपैकी १८ जागा आहेत.
पटना , मधुबनी आणि पूर्व चंपारण जिल्ह्यांमध्ये ४० वर्षांखालील ४.०२ लाख मतदार वगळण्यात आले आहेत, जे या जिल्ह्यांमध्ये काढून टाकण्यात आलेल्या एकूण मतदारांपैकी ३७.८७ टक्के आहे. हे असे मतदार आहेत ज्यांना २००३ च्या मतदार यादीचा भाग नसल्यामुळे एसआयआर दरम्यान नागरिकत्वाचा पुरावा सादर करणे आवश्यक होते. या जिल्ह्यांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त महिला मतदार वगळण्यात आले. त्यांची संख्या ५.६७ लाख आहे.
निवडणूक आयोगाने मतदार यादीतून नावे वगळण्यासाठी चार कारणे दिली आहेत, ज्यामध्ये कायमचे स्थलांतरित, मृत, अनुपस्थित आणि आधीच नोंदणीकृत यांचा समावेश आहे. या तीन जिल्ह्यांमध्ये कायमचे स्थलांतरित मतदारांची सर्वाधिक संख्या ३.९ लाख आहे. त्यानंतर ३.४२ लाख मतदारांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, २.२५ लाख गैरहजर राहिले आहेत आणि १.०४ लाख मतदार इतरत्र नोंदणीकृत आहेत.
बिहारमधील तिन्ही जिल्ह्यांमध्ये महिला मतदारांच्या स्थलांतराची संख्या वाढत असल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे. अधिकाऱ्यांच्या मते, महिलांच्या स्थलांतरामागील प्रमुख कारण कायमचे स्थलांतर (पतीच्या घरी जाणे इत्यादी) असून, पुरुष मतदारांमध्ये मृत्यू हे मुख्य कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे.मतदारांच्या वर्गीकरणात ‘कायमचे स्थलांतरित’ म्हणजे राज्याबाहेर गेलेले मतदार, ‘नोंदणीकृत स्थलांतरित’ म्हणजे राज्याबाहेरील इतरत्र मतदानासाठी नोंदणीकृत असलेले मतदार, आणि ‘अनुपस्थित’ म्हणजे जे मतदार नोंदणी असलेल्या पत्त्यावर उपलब्ध नाहीत – अशी विभागणी करण्यात आली आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार, स्थलांतराचे सर्वात सामान्य कारण रोजगार होते. बिहारसारख्या राज्यात बाहेरगावी स्थलांतरित होणाऱ्यांची संख्या देशातील सर्वाधिक असल्याचेही यातून समोर आले आहे. यामुळे मतदार यादीच्या अद्ययावत तपासणीच्या प्रक्रियेत स्थलांतराच्या या मुद्द्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे, असे निवडणूक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.