नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर जानेवारीपासून आतापर्यंतच्या नीचांकी पातळीवर आले आहेत. त्याचा आंतरराष्ट्रीय बेंचमार्क ब्रेंट ८१ डॉलरच्या खाली आणि अमेरिकी क्रूड ७४ डॉलर प्रति बॅरलच्या जवळ आला आहे. यामुळे यंदा मे नंतर पहिल्यांदा पेट्रोल-डिझेलचे दर घटण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्यामुळे देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती १४ रुपयाने स्वस्त होऊ शकतात.
विशेषत: ब्रेंटच्या किमतीत मोठ्या घसरणीमुळे भारतीय रिफायनरीसाठी कच्च्या तेलाची सरासरी किंमत (इंडियन बास्केट) कमी होऊन ८२ डॉलर प्रति बॅरल झाली आहे. मार्चमध्ये ती ११२,८ डॉलर बॅरल होती. या हिशेबाने गेल्या ८ महिन्यात रिफायनिंग कंपन्यांसाठी कच्च्या तेलाचे दर सुमारे ३१ डॉलर (२७.३%) कमी झाले आहेत. एसएमसी ग्लोबलच्या एका अहवालानुसार, क्रुडमध्ये १ डॉलर बॅरल घट झाल्याने देशाच्या तेल कंपन्यांना रिफायनिंगवर लिटरमागे ४५ पैशांची बचत होते. या हिशेबाने पेट्रोल-डिझेलचे दर लिटरमागे १४ रुपये कमी व्हायला हवेत.
सध्या देशात पेट्रोल आणि डिझेलच्या ज्या किमती आहेत, त्या हिशेबाने क्रूड ऑइलचे इंडियन बास्केट बॅरलमागे सुमारे ८५ डॉलर असायला हवे. मात्र ते ८२ डॉलरच्या जवळपास आले आहेत. या दरावर ऑइल मार्केटिंग कंपन्यांना बॅरलमागे (१५९ लिटर) रिफायनिंगवर सुमारे २४५ रुपये बचत होईल.