Poster outside Uttar Pradesh Congress office shows Rahul Gandhi as Lord Shri Ram political news
Rahul Gandhi as Shree Ram : उत्तर प्रदेश : देशामध्ये सर्वत्र मोठ्या उत्साहामध्ये विजयादशमी साजरी करण्यात आली. यानिमित्ताने रावण दहन करण्याची परंपरा आहे. अनेक ठिकाणी राजकीय टीका करणाऱ्या रावणाचे प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन करण्यात आले. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील कॉंग्रेसच्या एका पोस्टरची जोरदार चर्चा सुरु आहे. उत्तर प्रदेशमधील कॉंग्रेस कार्यालयाबाहेर दसऱ्याच्या निमित्ताने पोस्टरबाजी करण्यात आली. या पोस्टरमध्ये चक्क राहुल गांधींना प्रभू श्री राम दाखवण्यात आले आहे. यावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
दसऱ्याच्या निमित्ताने उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील काँग्रेस कार्यालयाबाहेर हे वादग्रस्त पोस्टर लावण्यात आले. कॉंग्रेसच्या या पोस्टरमुळे जोरदार राजकीय गोंधळ उडाला. काँग्रेस कार्यकर्ते आर्यन मिश्रा यांनी लावलेल्या या पोस्टरमध्ये कॉंग्रेस पक्षाचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना भगवान रामाच्या रूपात दाखवण्यात आले आहे.
पोस्टरमध्ये राहुल गांधी धनुष्यबाणाने रावणावर निशाणा साधताना दिसत आहेत. महत्त्वाचे म्हणजे, रावणाच्या दहा डोक्यांवर राजकारण आणि समाजाशी संबंधित मुद्दे लिहिलेले आहेत. यामध्ये महागाई, जंगलराज, भ्रष्टाचार, ईडी, मत चोरी, निवडणूक आयोग, सीबीआय, बेरोजगारी, पेपर लीक आणि हुकूमशाही असे शब्द आहेत. त्याचबरोबर पोस्टरमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय यांना लक्ष्मण म्हणून दाखवण्यात आले आहे. यावरुन भाजप पक्ष आक्रमक होण्याची शक्यता आहे.
VIDEO | Lucknow: A unique poster was put up outside the Congress office on Dussehra by Congress worker Aryan Mishra. The poster depicted Rahul Gandhi as Lord Ram, shooting arrows. Congress State President Ajay Rai was shown as Laxman in the poster. Ravana’s ten heads were… pic.twitter.com/EusIa25c9d — Press Trust of India (@PTI_News) October 3, 2025
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय यांना लक्ष्मण म्हणून दाखवण्यात आले आहे, जे राहुल गांधींसोबत उभे आहेत. पक्ष कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की हे पोस्टर सध्याच्या परिस्थिती आणि भाजप सरकारच्या धोरणांविरुद्ध जनतेचा राग प्रतिकात्मकपणे प्रतिबिंबित करते. त्यांचा असा विश्वास आहे की ज्याप्रमाणे भगवान रामांनी रावणाचा वध करून अधर्मावर धर्माचा विजय सुनिश्चित केला, त्याचप्रमाणे काँग्रेस जनतेच्या समस्या दूर करून बदल घडवून आणण्याचे काम करेल.
बेरोजगारीविरुद्ध काँग्रेसची लढाई
पोस्टर लावणारे आर्यन मिश्रा म्हणाले की, राहुल गांधी हे आजचे खरे राम आहेत, ते महागाई आणि बेरोजगारीसारख्या वाईट गोष्टींविरुद्ध लढत आहेत. त्यांनी असेही म्हटले की काँग्रेस ही एकमेव शक्ती आहे जी सध्याची राजकीय हुकूमशाही संपवू शकते.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
दसऱ्यासारख्या धार्मिक सणावर राजकीय पोस्टर लावल्याने विरोधी पक्षांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. तसेच काँग्रेस समर्थकांनी हे प्रतीकात्मक पोस्टर असून ते जनतेला सकारात्मक संदेश आणि पक्षाची विचारसरणी स्पष्टपणे करत असल्याचे म्हटले आहे. राहुल गांधी यांनी देशातील विविध भागामध्ये मतचोरी झाली असल्याचा दावा केला आहे. याबाबत त्यांनी अनेक पुरावे सादर करत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. कॉंग्रेसच्या या खास पोस्टरमध्ये मतचोरी देखील दाखवण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.