Ram Mandir Inauguration : अयोध्येत बहुप्रतिक्षित राम मंदिराचे उद्घाटन २२ जानेवारी रोजी होत आहे. यानिमित्ताने देशभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तर राजकीय पक्ष उद्घाटनाच्या निमंत्रणावरून एकमेकांवर टीका करीत आहेत. या दरम्यान आता बाबरी मशिदीचे पक्षकार दिवंगत हाशिम अन्सारी यांचे सुपुत्र इक्बाल अन्सारी यांची मोठी प्रतिक्रिया समोर आली आहे. “जर मला राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण मिळाले, तर मी उदघाटनाला उपस्थित राहिल”, असे विधान त्यांनी एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीला बोलताना केले. तसेच, अयोध्यामध्ये आता राम मंदिर झाल्यानंतर आगामी काळात हिंदू-मुस्लीम यांच्या संबंधावर काय परिणाम होतील? यावरही त्यांनी सविस्तर भाष्य केले आहे.
मोदी तर देशाचे पंतप्रधान
तत्पूर्वी ३० डिसेंबर २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा अयोध्येचा दौरा करीत रेल्वे स्थानक, आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि विविध विकासकामांचे उद्घाटन केले होते. त्यावेळी मोदी यांच्या स्वागतासाठी इक्बाल अन्सारी हेदेखील उभे असलेले दिसले. त्यांनी पंतप्रधान मोदींवर पुष्पवृष्टीही केली होती. याचा व्हिडिओ एका वृत्तसंस्थेने ट्विट केला होता. यावर प्रतिक्रिया देताना अन्सारी म्हणाले की, अयोध्यात जितकेही पाहुणे येतात, त्यांचे आम्ही स्वागत करतो. मोदी तर देशाचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे मोदीजी जेव्हा आले, तेव्हा त्यांच्यावर मीही फुलं उधळली.
त्यानंतर आमच्यासाठी विषय संपला
इक्बाल अन्सारी यांचे वडील हाशिम अन्सारी यांनी १९५२ पासून बाबरी मशिदीची कायदेशीर लढाई लढली होती. त्यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र इक्बाल अन्सारी हे या खटल्याचे पक्षकार होते. राम मंदिराचे आता निर्माण झाल्यानंतर काय वाटत आहे, असा प्रश्न त्यांना विचारला असता ते म्हणाले, “९ नोव्हेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर संपूर्ण देशातील मुस्लीम नागरिकांनी त्याचा सन्मान केला. पूर्ण देशात एक पानही हलले नाही. हिंदू-मुस्लीमांचा बंधूभाव कायम आहे. त्यामुळे आमच्यासाठी हा विषय आता संपलेला आहे. राम मंदिर उभे राहिले, याचा आनंद वाटतो. २२ जानेवारीच्या सोहळ्याचे निमंत्रण मला अजून आलेले नाही. पण आले तर मी नक्की जाईन.”
राजकारण्यांचे ऐकू नका..
इक्बाल अन्सारी पुढे म्हणाले, मी समाजसेवक आहे. देशात हिंदू-मुस्लीम, मंदिर-मशीद यावरून वाद व्हायला नको. नेते काहीतरी प्रतिक्रिया देऊन वाद निर्माण करतात, मौलाना फतवा काढतात, पण लोकांनी स्वतः विचार केला पाहिजे. याने देशाचा विकास होणार आहे का? माणूस ज्यासाठी जन्माला आला आहे, तेच त्याने केले पाहिजे. एकमेकांना साहाय्य करायला हवे. विकासासाठी, रोजगारासाठी प्रयत्न केले पाहिजेत. हिंदू-मुस्लीम धर्मीयांमध्ये दरी निर्माण होईल, असे कोणतेही काम आपल्या हातून व्हायला नको, याची काळजी सर्वांनीच घ्यावी.”