राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या MGAHV दीक्षांत समारंभासाठी वर्धा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहे (फोटो - सोशल मीडिया)
President Murmu Wardha Visit : वर्धा : देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या सहाव्या दीक्षांत समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून त्या येणार आहेत. त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे. विद्यापीठाचा सहावा दीक्षांत समारंभ गुरुवार, १६ एप्रिल रोजी सकाळी ११:२५ वाजता टागोर सांस्कृतिक संकुलातील निराला सभागृहात होणार आहे. (Wardha News)
राष्ट्रपती आणि विश्वविद्यापीठाच्या कुलपती द्रौपदी मुर्मू प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील आणि दीक्षांत भाषण देतील. या दीक्षांत समारंभातील विशेष पाहुण्यांमध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, शिक्षण राज्यमंत्री आणि वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर आणि कार्यकारी परिषद सदस्य प्रा. सुरेंद्र दुबे यांचा समावेश असेल. या कार्यक्रमामुळे वर्धामध्ये जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे. प्रशासन तयारीला लागले असून वर्धात सुरक्षेमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे.
हे देखील वाचा : निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यादांच होणार EVM ची तपासणी, उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश
राष्ट्रपती मुर्मूंचा दुसऱ्यांदा वर्धा दौरा
विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. कुमुद शर्मा हे देखील दीक्षांत समारंभाचे भाषण देतील.राष्ट्रपतींची ही विद्यापीठाला दुसरी भेट आहे. मात्र विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच राष्ट्रपती दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार आहेत. विद्यार्थ्यांना सुवर्णपदके आणि इतर सन्मान व पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल.
यापूर्वी, २००७ साली तत्कालीन राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी विद्यापीठाला भेट देऊन विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण संचालनालयाचे उद्घाटन केले होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या स्वागतासाठी विद्यापीठात तयारी सुरू आहे. जिल्हा प्रशासन आवश्यक सुरक्षा आणि वाहतुकीची व्यवस्था करत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या आगमनानिमित्त विद्यापीठात प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.
हे देखील वाचा : ‘परदेशात नियम पाळता, मग भारतात का नाही?’ मुंबई उच्च न्यायालयाने नागरिकांना सुनावले खडे बोल; अपघात प्रकरणावर दिला मोठा निकाल
विविध समित्यांची स्थापना
पदवी प्रदान समारंभाचे यशस्वी आयोजन सुनिश्चित करण्यासाठी विद्यापीठाने विविध समित्या स्थापन केल्या असून, सर्व समित्या सक्रियपणे कार्यरत आहेत. कुलगुरू प्रा. कुमुद शर्मा यांनी समन्वय समिती, स्वागत समिती, पदवी आणि प्रमाणपत्र वितरण समिती, माध्यम समिती, वाहतूक आणि इतर समित्यांसोबत बैठका घेऊन कार्यक्रमाच्या सुरळीत आयोजनासाठी आवश्यक मार्गदर्शन केले.






