मणिपूरमध्ये अखेर राष्ट्रपती राजवट लागू
नवी दिल्ली : भाजप नेते एन. बिरेन सिंग यांनी काही दिवसांपूर्वीच मणिपूरच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. एन. बिरेन सिंग यांनी मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्याकडे हा राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर केंद्र सरकारने गुरुवारी हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली आहे. एन. बिरेन सिंग यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रपती राजवटीचा निर्णय घेण्यात आला आहे.
एन. बिरेन सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. बिरेन सिंग यांनी राजभवनावर जाऊन राज्यपालांकडे राजीनामा सोपवला होता. गेल्या दोन वर्षांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. मणिपूरमध्ये सुरू असलेल्या वांशिक हिंसाचाराच्या 21 महिन्यांनंतर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. येथील हिंसाचारात 250 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
गृह मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, मणिपूरमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, येथील सरकार भारतीय संविधानातील तरतुदींनुसार काम करू शकत नाही, म्हणून राष्ट्रपती संविधानाच्या कलम ३५६ मध्ये दिलेल्या अधिकारांचा वापर करून मणिपूरचे प्रशासन आपल्या हातात घेत आहे.
दरम्यान, मणिपूर राज्यातील विधानसभेचे शेवटचे अधिवेशन 12 ऑगस्ट 2024 मध्ये पार पडले. यापूर्वी, 9 फेब्रुवारी रोजी बिरेन सिंग यांनी राजधानी इंफाळमध्ये मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्याकडे राजीनामा सादर केला होता. विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याच्या एक दिवस आधी बिरेन सिंह यांनी राजीनामा दिला होता, त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन रद्द करण्यात आले.
ऑडिओ टेपवरून गोंधळ
यापूर्वी मणिपूर हिंसाचारात बिरेन सिंगचा सहभाग असल्याचा दावा करणारी एक ऑडिओ टेप प्रसिद्ध करण्यात आली होती. राजीनामा देण्याच्या फक्त 5 दिवस आधी सर्वोच्च न्यायालयाने या लीक झालेल्या ऑडिओ टेपचा फॉरेन्सिक अहवाल मागितला होता. ऑडिओ टेपमध्ये बिरेन सिंग यांना राज्यात शस्त्रास्त्रांची लूट करण्यास परवानगी दिल्याचे कथितपणे ऐकू येते, त्यानंतर विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते.
एन. बिरेन सिंग यांच्याविरुद्ध भाजपमध्ये नाराजी
एन. बिरेन सिंग यांच्याविरुद्ध भाजपमध्ये नाराजी असल्याचे म्हटले जात आहे. एन. बिरेन सिंग यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर थोड्याच वेळात भाजपच्या विधिमंडळ गटाची महत्वाची बैठकही झाली. या बैठकीत विधिमंडळ गटाचा नेता म्हणजेच मणिपूरचा पुढील मुख्यमंत्री कोण असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. असे असताना आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली गेली आहे.