
आईच्या पोटातच बाळावर मणक्याची शस्त्रक्रिया; गुंतागुंतीवर केली मात
नवी दिल्ली : वैद्यकीय क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) गर्भावस्थेच्या २५ व्या आठवड्यातच गर्भातील बाळाच्या मणक्यावरील गंभीर दोषावर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. भारतात प्रथमच करण्यात आलेल्या या शत्रक्रियेला ‘ओपन फीटल रिपेअर’ असे म्हणतात. या प्रक्रियेमुळे जन्मानंतर बाळाला होऊ शकणारे काही गंभीर न्यूरोलॉजिकल दुष्परिणाम कमी करण्यास मदत होऊ शकते.
गर्भातील बाळाला ‘लुंबोसॅक्रल मायलोमेनिंगोसील’ हा स्पायना बिफिडाचा गंभीर प्रकार होता. या आजारात मणक्याच्या हाडांमध्ये दोष निर्माण होतो आणि त्यातून मज्जारज्जू व त्याच्या आवरणाचा काही भाग बाहेर येतो. त्यामुळे मेंदू आणि मणक्याभोवती असणारा सेरेब्रोस्पायनल द्रव गळू शकतो. परिणामी, बाळाला जन्मानंतर पायांचा पक्षाघात, हायड्रोसेफालस आणि इतर गंभीर न्यूरोलॉजिकल समस्या उद्भवण्याचा धोका असतो.
दरम्यान, एम्सच्या न्यूरोसायन्सेस सेंटरमध्ये ही सहा तासांची शस्त्रक्रिया करण्यात आली. गर्भाशय उघडून गर्भातील बाळाच्या मणक्यातील दोष दुरुस्त करण्यात आला. अत्याधुनिक मायक्रोस्कोप आणि सातत्यपूर्ण अल्ट्रासोनोग्राफीच्या मदतीने ही प्रक्रिया पार पडली. शस्त्रक्रियेपूर्वी पाच आठवड्यांहून अधिक काळ विविध विभागांच्या तज्ज्ञांनी नियोजन केले होते. न्यूरोसर्जरी विभागाचे प्रा. दीपक गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.
शस्त्रक्रियेची वैशिष्ट्ये
गर्भावस्थेचा कालावधी २५ आठवडे
आजाराचे नाव : लुबोसॅक्रल मायलोमेनिगोसील (मज्जारज्जूचा गंभीर आजार)
शस्त्रक्रियेचा कालावधी ६ तास
खर्च : जननी शिशू सुरक्षा कार्यक्रमाअंतर्गत मोफत
तज्ज्ञांना सल्ला
गर्भधारणेपूर्वीच फॉलिक अॅसिडचे सेवन, अन्नपदार्थाचे फोलेटने समृद्धीकरण आणि राष्ट्रीय आरोग्य निगराणी व्यवस्था आवश्यक.
काय आहे स्पायना बिफिडा?
मणक्यांच्या हाडांमध्ये दोष निर्माण होतो. मज्जारज्जू आणि त्याच्या आवरणाचा भाग बाहेर येतो. यातून मेंदू आणि मणक्याचा द्रव गळू लागतो.
शस्त्रक्रियेचा उद्देश काय?
मज्जारज्जूचे नुकमास मर्यादित ठेवणे. हायड्रोसेफालसचा धोका कमी करणे आणि काही न्युरॉलॉजीकल परिणाम कमी करणे.
1. गर्भातील बाळावर शस्त्रक्रिया कुठे करण्यात आली?
दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) येथे ही शस्त्रक्रिया करण्यात आली.
2. गर्भावस्थेच्या कितव्या आठवड्यात शस्त्रक्रिया झाली?
गर्भावस्थेच्या २५ व्या आठवड्यात ही शस्त्रक्रिया करण्यात आली.
3. या शस्त्रक्रियेचे नाव काय आहे?
या शस्त्रक्रियेला ‘ओपन फीटल रिपेअर’ (Open Fetal Repair) असे म्हणतात.