

एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सला मिळाली मान्यता
संवादासाठी ऑप्टिकल लिंकचा वापर
प्रकल्पाला खगोलशास्त्रज्ञांच्या संघटनेचा विरोध
SpaceX : कृत्रिम बुद्धिमत्तेची (AI) वाढती गरज लक्षात घेऊन अमेरिकेने अंतराळात डेटा सेंटर उभारण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. अमेरिकेच्या नियामकांनी एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सला पृथ्वीच्या कक्षेत तब्बल 10 लाख उपग्रह तैनात करण्यास मंजुरी दिली आहे.
हे उपग्रह अंतराळात डेटा सेंटर म्हणून काम करणार असून, एआयशी संबंधित संगणकीय प्रक्रिया पार पाडतील. मात्र, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे खगोलशास्त्रीय संशोधनात अडथळे निर्माण होण्याची आणि रात्रीच्या आकाशाचे स्वरूप बदलण्याची भीती खगोलशास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.
अमेरिकेच्या फेडरल कम्युनिकेशन्स कमिशनने (एफसीसी) दिलेल्या माहितीनुसार, प्रस्तावित 'स्टारमाइंड' नेटवर्कच्या माध्यमातून अंतराळात डेटावर प्रक्रिया करून त्याचा वापर पृथ्वीवरील गरजांसाठी केला जाणार आहे. एआय कम्प्युटिंगची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी ही यंत्रणा उपयुक्त ठरण्याची अपेक्षा आहे. अंतराळात डेटा सेंटर उभारण्यासाठी अमेरिकेने दिलेली ही पहिलीच मंजुरी असल्याचे सांगितले जात आहे.
या मंजुरीमुळे उपग्रहांचे नेटवर्क उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असला, तरी हे उपग्रह आतापर्यंत प्रक्षेपित झालेले नाहीत. या उपग्रहांमध्ये परस्पर संवादासाठी ऑप्टिकल लिंकचा वापर केला जाणार आहे. तर रेडिओ लिंकचा वापर पर्यायी आणि आपत्कालीन संपर्कासाठी होईल. अंतराळातील कचऱ्याबाबतच्या नियमांचे पालन या यंत्रणेद्वारे केले जाईल, असे एफसीसीने स्पष्ट केले आहे.
एफसीसीचे अध्यक्ष ब्रेंडन कार यांनी या निर्णयाचे समर्थन केले आहे. अमेरिका जगाला 'सुपर इंटेलिजन्स'च्या युगाकडे घेऊन जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अमेरिकेचे नेतृत्व आणि विकास कायम ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या संगणकीय पायाभूत सुविधांच्या उभारणीतील हे महत्त्वाचे पाऊल असल्याचेही त्यांनी नमूद केले. पृथ्वीवरील डेटा सेंटरवरील वाढता ताण कमी करण्यासाठी संगणकीय क्षमता अंतराळात नेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकल्पाला खगोलशास्त्रज्ञांच्या संघटनेने विरोध दर्शवला आहे. 'अमेरिकन अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी'ने एफसीसीच्या निर्णयाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मोठ्या संख्येने उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत आल्यास ते रात्रीच्या आकाशात अधिक काळ चमकत राहू शकतात. त्यामुळे खगोलीय निरीक्षण आणि संशोधनात अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे, असा इशारा संघटनेने दिला आहे.
उपग्रहांमधून निर्माण होणारे रेडिओ उत्सर्जन आणि उष्णतेमुळे रेडिओ तसेच इन्फ्रारेड खगोलशास्त्रीय संशोधनावरही परिणाम होऊ शकतो. याशिवाय, उपग्रहांची एकमेकांशी टक्कर होण्याचा धोका, प्रक्षेपणामुळे होणारे प्रदूषण आणि उपग्रह पुन्हा वातावरणात प्रवेश करताना निर्माण होणारे परिणाम याबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
स्पेसएक्सने यापूर्वी स्टारलिंक उपग्रहांच्या रचनेत बदल करून खगोलशास्त्रीय निरीक्षणांवरील परिणाम कमी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे काही प्रमाणात सुधारणा झाली असली, तरी समस्या पूर्णपणे दूर झालेल्या नाहीत, असे सोसायटीने म्हटले आहे. दहा लाख उपग्रहांचा प्रस्ताव हा यापेक्षा कितीतरी मोठ्या प्रमाणावरील प्रकल्प असल्याचेही संघटनेने स्पष्ट केले.
एफसीसीच्या परवान्याच्या अटींनुसार, स्पेसएक्सला 2033 पर्यंत उपग्रह तैनात करण्यास सुरुवात करावी लागणार आहे. 2035 पर्यंत एक लाख उपग्रह कक्षेत स्थापित करणे, तर 2040 पर्यंत संपूर्ण नेटवर्क उभारणे अपेक्षित आहे. या प्रकल्पाला मंजुरी देऊ नये, अशी मागणी अमेरिकन अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीने मार्चमध्येच एफसीसीकडे केली होती. तसेच, स्पेसएक्सने नॅशनल सायन्स फाउंडेशनसोबत समन्वय ठेवून काम करावे, अशी अपेक्षाही संघटनेने व्यक्त केली आहे.