देहरादून: उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचा धोका डोके वर काढत आहे. अलीकडेच राज्यातील देहरादून आणि नैनिताल जिल्ह्यात कोविड-१९ चे दोन नवीन रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. विशेषतः चारधाम यात्रेच्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी महत्त्वाची मानली जात आहे, कारण दरवर्षी लाखो भाविक देशभरातून या यात्रेत सहभागी होतात. अशा वेळी संसर्गाचा प्रसार होण्याची शक्यता अधिक असते.
उत्तराखंडच्या आरोग्य महासंचालक डॉ. सुनीता तम्टा म्हणाल्या की, “देशभरात सध्या कोरोना संसर्गाचे सुमारे २७७ रुग्ण आढळले असून त्यापैकी बहुतांश प्रकरणे तामिळनाडू, महाराष्ट्र आणि केरळ राज्यांतील आहेत. उत्तराखंडमध्ये सध्या सक्रिय रुग्ण नाहीत, मात्र बाहेरून आलेल्या दोन व्यक्तींमध्ये कोरोनाची पुष्टी झाल्यामुळे खबरदारी घेणे गरजेचे आहे.” या पार्श्वभूमीवर, राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये कोविड प्रोटोकॉल पुन्हा लागू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिल्हास्तरीय आरोग्य केंद्रांना वैद्यकीय तयारीचा आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
‘इंदिरा गांधी बोलत आहेत, मला गोपनीय कामासाठी ६० लाख रुपये हवे आहेत’; देशाला हादरवून टाकणारा घोटाळा
राज्य सरकारने चारधाम मार्गांवरील आरोग्य केंद्रे पुन्हा सक्रिय करण्याचे आदेश दिले आहेत. भाविकांच्या आरोग्यासाठी पूर्व तपासणी, गर्दी टाळणे आणि खबरदारीचे उपाय यावर भर देण्यात येणार आहे. सध्या तरी यात्रेवर कोणताही परिणाम झालेला नसला तरी, प्रकरणे वाढल्यास नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जाऊ शकतात, असे संकेत आरोग्य विभागाने दिले आहेत.
आरोग्य विभागाने नागरिकांना पुन्हा एकदा मास्क घालणे, हात धुणे आणि सामाजिक अंतर राखणे या जुन्या पण प्रभावी कोविड नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः चारधाम यात्रा करणाऱ्यांनी स्वतःची आरोग्य तपासणी करूनच प्रवास करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
ISI Spy Arrest: गुजरातमध्ये वाढवत होता ISIचे जाळे; ATS कडून अहमदाबादमध्ये गुप्तहेराला अटक
या नव्याने आढळलेल्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर, चारधाम यात्रा २०२५ पूर्वी प्रशासनासाठी एक प्रकारचा इशारा मानला जात आहे. आता हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल की, राज्य सरकार आणि आरोग्य विभाग मिळून या संभाव्य संकटाचा सामना कसा करतात आणि यात्रेकरूंची सुरक्षितता कशी सुनिश्चित करतात.