मुंबई : बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांच्या निधनाने राजकीय जगतातही शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. मनोज कुमार यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात निधन झाले. पद्मश्री आणि दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते मनोज कुमार यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.
भारतीय चित्रपटसृष्टीतील महान अभिनेते आणि चित्रपट निर्माते मनोज कुमार यांच्या निधनाने देशभरात शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये मनोज कुमार यांच्यासोबतचे जुने फोटो शेअर करत लिहिले, “महान अभिनेते आणि चित्रपट निर्माते मनोज कुमार जी यांच्या निधनाने खूप दुःख झाले. ते भारतीय चित्रपटसृष्टीचे एक आदर्श होते. त्यांच्या देशभक्तीच्या भावनेसाठी त्यांना विशेषतः आठवले जात असे. त्यांच्या चित्रपटांमध्ये देशभक्तीचे भाव स्पष्ट दिसून येत. मनोजजींच्या कार्यांनी राष्ट्रीय अभिमानाची भावना जागृत केली आहे आणि ती पिढ्यांना प्रेरणा देत राहील. या दुःखाच्या वेळी मी त्यांच्या कुटुंबासोबत आणि चाहत्यांसोबत आहे. ओम शांती.”
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही शोक व्यक्त करत लिहिले,“मनोज कुमार जी एक बहुमुखी अभिनेते होते, जे देशभक्तीपर चित्रपटांसाठी नेहमीच ओळखले जातील. ‘भारत कुमार’ म्हणून ज्यांना लोक प्रेमाने ओळखतात, अशा या कलाकाराने ‘उपकार’, ‘पूरब और पश्चिम’ यांसारख्या चित्रपटांमधून अविस्मरणीय अभिनय साकारला. त्यांच्या कामाने आपली संस्कृती समृद्ध केली असून, त्यांचा वारसा चित्रपटसृष्टीत सदैव जिवंत राहील. त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांना माझ्या हार्दिक संवेदना. ओम शांती.” मनोज कुमार यांनी आपल्या अभिनयातून देशप्रेमाचे बीज अनेकांच्या मनात पेरले. त्यांच्या निधनाने एक सुवर्णयुग संपल्याची भावना रसिकप्रेमींमध्ये व्यक्त होत आहे.
मनोज कुमार यांना ७ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. पहिला फिल्मफेअर पुरस्कार १९६८ मध्ये ‘उपकार’ चित्रपटासाठी मिळाला. ‘उपकार’ ला सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट कथा आणि सर्वोत्कृष्ट संवाद असे चार फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. १९९२ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०१६ मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Waqf Amendment Bill : लोकसभेनंतर आता राज्यसभेतही विधेयक मंजूर; विधेयकाच्या बाजूने 128 मते
मनोज कुमार : संघर्षातून उभा राहिलेला ‘भारत कुमार’
भारतीय सिनेसृष्टीत ‘भारत कुमार’ म्हणून ओळख मिळवलेल्या मनोज कुमार यांचे खरे नाव हरिकृष्ण गोस्वामी होते. त्यांचा जन्म २४ जुलै १९३७ रोजी ब्रिटिश भारतातील अबोटाबाद (आताचा खैबर पख्तूनख्वा, पाकिस्तान) येथे झाला. विशेष म्हणजे, अमेरिकेने ओसामा बिन लादेनला जिथे ठार केले, तो हाच अबोटाबाद आहे. १९४७ मध्ये भारत-पाक फाळणीच्या वेळी मनोज कुमार केवळ १० वर्षांचे होते. त्याच दरम्यान त्यांच्या धाकट्या भावाचा जन्म झाला. मात्र, त्यांच्या कुटुंबावर दुर्दैवाने कठीण प्रसंग ओढवला.
फाळणीच्या वेळी सुरू झालेल्या दंगलीमुळे त्यांच्या कुटुंबावर संकट कोसळले. मनोज कुमार यांच्या आईची तब्येत बिघडली, त्यामुळे त्यांना २ महिन्यांच्या भावासह रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दंगली पेटल्यानंतर परिस्थिती हाताबाहेर गेली. जीव वाचवण्यासाठी रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सेस भूमिगत झाल्या, आणि रुग्ण उपचाराविना तडफडू लागले.
अशा परिस्थितीत त्यांचा लहान भाऊ योग्य उपचाराअभावी दगावला, तर आईच्या वेदना वाढत गेल्या. मदतीसाठी कोणीही नव्हते. ही हतबलता पाहून १० वर्षांच्या मनोजच्या मनात संताप उसळला. त्यांनी रागाच्या भरात एक काठी उचलली आणि भूमिगत झालेल्या डॉक्टर-नर्सेसना मारहाण करण्यास सुरुवात केली. मात्र, त्यांच्या वडिलांनी त्यांना रोखले आणि परिस्थिती अधिक गंभीर होण्याआधीच पाकिस्तान सोडण्याचा निर्णय घेतला.
त्यांचे कुटुंब जंदियाला शेरखानमधून पळून दिल्लीला आले. इथे त्यांनी २ महिने निर्वासित छावणीत काढले. हळूहळू परिस्थिती सुधारत गेली आणि कुटुंब दिल्लीमध्ये स्थायिक झाले. मनोज कुमार यांना शिक्षण सुरू ठेवण्याची संधी मिळाली.
शालेय शिक्षणानंतर त्यांनी हिंदू कॉलेजमधून पदवी पूर्ण केली आणि पुढे आपल्या कारकिर्दीकडे वाटचाल सुरू केली. कठीण परिस्थिती, संघर्ष आणि कुटुंबाच्या दु:खाचा साक्षीदार असलेल्या मनोज कुमार यांनी नंतरच्या काळात भारतीय संस्कृती, देशभक्ती आणि आदर्शवाद यांचा संगम असलेल्या ‘उपकार’, ‘पूरब और पश्चिम’, ‘क्रांती’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांद्वारे प्रेक्षकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केले.