नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) शानदार विजय मिळवत 27 वर्षांनंतर राजधानीच्या सत्तेत पुनरागमन केले आहे. 70 सदस्यीय विधानसभा निवडणुकीत भाजपने 48 जागांवर विजय मिळवला आहे.मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराबाबत चर्चा सुरू असून, 10 फेब्रुवारी रोजी गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, बैजयंत पांडा आणि बी. एल. संतोष उपस्थित होते. यासगळ्यात शपथविधी सोहळ्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर दिल्लीमध्ये शपथविधी होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान 14 फेब्रुवारी रोजी देशात परत येतील, त्यानंतर हा सोहळा आयोजित केला जाणार आहे. हा शपथविधी अत्यंत भव्य असेल, ज्यामध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (NDA) प्रमुख नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तसेच, NDA शासित राज्यांतील मुख्यमंत्र्यांनाही आमंत्रित केले जाणार आहे. निवडणूक निकालानंतर शनिवारी भाजप मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत शपथविधी आणि नव्या सरकारच्या स्थापनेबाबत चर्चा झाली होती.
Bhagwant Mann : आपला आणखी मोठा धक्का बसणार? भगवंत मान केंद्रीय गृहमंत्रालयाच्या संपर्कात?
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, 5 फेब्रुवारी रोजी झालेल्या मतदानात भाजपला 45.56 टक्के आणि आम आदमी पक्षाला (AAP) 43.57 टक्के मते मिळाली. मात्र, जागांमध्ये मोठी आघाडी घेत भाजपने 48 जागांवर विजय मिळवला, तर AAPच्या खात्यात 22 जागा गेल्या.
भाजपच्या विजयी 48 जागांपैकी 4 जागा अनुसूचित जाती (SC) आणि 16 जागा इतर मागासवर्ग (OBC) प्रवर्गातील उमेदवारांनी जिंकल्या आहेत. दिल्लीच्या सीमावर्ती भागातही भाजपने प्रभावी कामगिरी केली. राजधानीच्या हरियाणा आणि उत्तर प्रदेश सीमेला लागून असलेल्या 22 पैकी 15 जागांवर भाजपचा विजय झाला आहे. यामुळे दिल्लीतील सत्तांतर निश्चित झाले असून, आता भाजपचा मुख्यमंत्री कोण होणार आणि नव्या सरकारच्या धोरणांबाबत चर्चा सुरू आहे.