
सैजन्य - सोशल मिडीया
नवी दिल्ली १८ जून : काँग्रेस खासदार राहुल गांधी य़ांनी वायनाड लोकसभेची जागा सोडण्याचा निर्णय घेतला. या जागेवरून आता त्यांच्या बहीण आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी या जागेवर निवडणूक लढवणार असल्याची बातमी आहे. पण राहुल गांधी यांनी वायनाडची जागा का सोडली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्याचे कारणही तसेच आहे.
रायबरेली हे गांधी घराण्याचे पारंपरिक ठिकाण आहे. माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, भारताच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी रायबरेली या लोकसभेच्या जागेवरून खासदार म्हणून निवडून आले होते. त्यामुळे या जागेशी गांधी घराण्याचे भावनिक नाते आहे. राहुल यांनी सोनिया गांधींच्या जागी रायबरेलीतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तेव्हा सोनिया गांधींनी निवडणूक प्रचारादरम्यान रायबरेलीच्या जनतेला ‘मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवत आहे,’ असे भावनिक आवाहन केले होते.
याशिवाय उत्तर प्रदेशच्या राजकारणाच्या दृष्टिनेही रायबरेलीची जागा काँग्रेस आणि राहुल या दोघांसाठी खूप महत्त्वाची मानली जाते. यावेळी राहुल यांनी रायबरेलीतून निवडणूक लढवल्याने काँग्रेसच्या कामगिरीवरही त्याचा परिणाम झाला. गेल्या निवडणुकीत केवळ एक जागा मिळालेल्या काँग्रेसने यावेळी यूपीमध्ये सहा जागा जिंकल्या आणि आता काँग्रेसची नजर २०२७ च्या यूपी विधानसभा निवडणुकीकडे आहे.
रायबरेलीतील विजयानंतर रायबरेलीत आभारप्रदर्शन कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी म्हणाले होते की, “रायबरेलीच्या निवडणुकीत माझ्या बहिणीने येथे केलेल्या मेहनतीबद्दल, तिने केलेल्या कामाबद्दल मी माझ्या बहिणीचे आणि तुमचे मनापासून आभार मानतो. माझ्याकडे आणखी एक कल्पना आहे, ती मी तुम्हाला नंतर सांगेन.”
या कार्यक्रमानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मलिकार्जुन खरगे यांच्या घरी काँग्रेस कमिटीची बैठक झाली होती. या बैठकीत काँग्रेसला नवसंजीवनी देणाऱ्या या कल्पनेवर चर्चा झाली असावी असा कयास लावला जात आहे.
देशातील सर्वात मोठ्या निवडणूक राज्यात विधानसभेत काँग्रेसला केवळ दोन जागांवर सामाधान मानावे लागले होते. गेल्या दहा वर्षांत याठिकाणी काँग्रेसचा सुफडा साफ झाला होता. पण १० वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची मतांची टक्केवारी 10 टक्क्यांच्या जवळ पोहोचली आहे. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्याशी केलेल्या युतीचा फायदा करून घेऊन उत्तर प्रदेशात काँग्रेसने गमावलेली राजकीय जागा हळूहळू पुन्हा मिळवता येईल, असा काँग्रेसला विश्वास आहे.
यावेळच्या निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसला दिल्लीपर्यंत आपले स्थान मजबूत करायचे असेल तर यूपीमध्ये सीट्स आणि जागा दोन्ही वाचवाव्या लागतील, अशी कल्पना पुढे आली आहे. रायबरेली असो की अमेठी, प्रियांका गांधी यांनी आपल्या आक्रमक प्रचारशैलीतून काँग्रेसची बाजू बळकट केली. प्रियांका गांधीनी रायबरेलीत नऊ दिवस आणि अमेठीत सात दिवस प्रचार केला. गेल्या तीन लोकसभा निवडणुकांच्या तुलनेत या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने उत्तर प्रदेशात सर्वोत्तम कामगिरी केली. जागा वाढल्या, मतांची टक्केवारीही वाढली. त्यामुळे रायबरेलीची जागा राखून राहुल गांधींनी युपीमध्ये पक्षाला आघाडीतून पुढे न्यावे आणि 2027 च्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षासोबत युती केली तर संधी मिळू शकते.
उत्तर प्रदेशात काँग्रेसची ताकद कमी आहे. लोकसभेत युपीतील 80 खासदारांपैकी काँग्रेसचे 6 खासदार आहेत, तर 2014 मध्ये दोन होते तर 2019 मध्ये फक्त एक खासदार होता. देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या यूपीमध्ये काँग्रेसचे दोन आमदार आहेत, तर 33 राज्यसभा खासदारांपैकी एकही काँग्रेसचा खासदार नाही. यूपी विधान परिषदेच्या 100 जागांमध्ये काँग्रेसचा एकही एमएलसी नाही. हा सर्व विचार करता रायबरेली असो वा अमेठी, प्रचार करून मैदान कोणी मजबूत केले असेल तर ते प्रियांका गांधी यांनी. त्यामुळे राहुल गांधी रायबरेलीची जागा स्वत:कडे ठेवणार आहेत. तर प्रियांका गांधी यांच्याकडे वायनाडची जागा दिली जाणार आहे. प्रियांका गांधी वायनाडमधून निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. कारण १५ वर्षांनंतर युपीतील परिस्थिती बदलता येऊ शकते असा विश्वास आता काँग्रेसला वाटू लागला आहे.