डेहराडून : हवाई दलाने उत्तराखंडच्या लगखागाच्या जवळ १७ हजार फूट उंचावर मोठे रेस्क्यू ऑपरेशन सुरु केले आहे. या ठिकाणी पर्यटक, पोर्टर्स आणि गाईड यांच्यासह १७ गिर्यारोहक बर्फवृष्टी आणि खराब हवामानामुळे रस्ता चुकले होते. १८ ऑक्टोबरपासून हे १७ ट्रेकर्स बेपत्ता होते. यातील ११ जणांचे मृतदेह लमखागा जवळ रस्त्याच्या बाजूला सापडले आहेत.
या गिर्यारोहकांनी १४ ऑक्टोबरपासून उत्तराखंडच्या हर्षिल येथून ट्रेकिंग सुरु केले होते. त्यांना हिमाचल प्रदेशच्या छितकुल इथे पोहचायचे होते. मात्र १७ ते १९ ऑक्टोबरच्या काळात खराब हवामानामुळे ते लमखागा परिसरात रस्ता चुकले आणि बेपत्ता झाले. उत्तराखंडच्या हर्षिल आणि हिमाचल प्रदेशच्या किन्नोरोला जोडणारा लमखागा हा दुर्गम पास आहे.
खराब हवामानातही एअरफोर्सचे रेस्क्यू ऑपरेशन
एयरफोर्सने बुधवारी सर्च ऑपरेशनसाठी दोन हेलिकॉप्टर तैनात केले होते. गुरुवारी १५,७०० फूट उंचीवर त्यांना ४ मृतदेह सापडले. १६,८०० फूट उंचीवर एका जिवंत व्यक्तीची सुटका करण्यात एअरफोर्सच्या जवानांना यश मिळाले. या गिर्यारोहकाची परिस्थिती अतिशय बिकट होती, त्याला हाचलाचही करता येत नव्हती. २२ ऑक्टोबरला खराब हवामानातही आणखी एका व्यक्तीला वाचवण्यात यश मिळाले, आणि त्याच दिवशी १६,५०० फूट उंचीवर आणखी पाच मृतदेह एअरफोर्सने शोधून काढले आहेत. एका संयुक्त गस्ती पथकाने आणखी दोन मृतदेह शोधून काढले.
हे गिर्यारोहक मोरी साकरीहून एका ट्रेकिंग एजन्सीच्या माध्यमातून हर्षिलहून छितकुलसाठी रवाना झाले होते. गिर्यारोहकांच्या दलाने १३ ते २१ ऑक्टोबरपर्यंत लमखागा पासमध्ये ट्रेकिंगसाठी उत्तरकाशी जिल्ह्याच्या वनविभागाकडून रितसर परवानगीही घेतली होती. खराब हवामानामुळे गिर्यारोहक रस्ता चुकले आणि त्यातील ११ जणांना प्राणाला मुकावं लागलं आहे.
एकाची प्रकृती गंभीर
या गिर्यारोहकांशी संपर्क तुटल्यानंतर आणि १९ ऑक्टोबरला ते छितकुलला पोहचले नसल्याचे लक्षात येताच ट्रेकिंग एजन्सीने उत्तराखंड सरकारशी संपर्क साधला. त्यानंतर गिर्यारोहोकांचा शोध सुरु झाला. किन्नोर जिल्हा प्रशासनाला बुधवारी याची माहिती मिळाली, त्यानंतर क्यूआरटी टीम्स, पोलीस आणि वनविभागाने शोध मोहीम हाती घेतली. ११ मृतदेह सापडले असून, दोघा जणांना जिवंत वाचवण्यात आले आहे. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. अद्याप चार जणांचा शोध सुरु असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.