अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे संस्थापक असलेल्या भ्रष्टाचारविरोधी जनांदोलनाच्या नगर येथील कार्यकर्त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी नुकत्याच केलेल्या वादातीत वक्तव्यबद्दल दख्खनचा काटेरी गुच्छ (डेक्कन थॉर्णी बुके) पाठवला आहे. निवासी जिल्हाधिकारी संदीप निचीत यांना याबाबतचे निवेदन देण्यात येत कार्यालयाकडे गुच्छ देण्यात आला.
राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत केलेल्या वक्त्यावरून भ्रष्टाचारविरोधी जनांदोलनाच्या वतीने निषेध करण्यात आला.
राष्ट्रपती आणि देशातील सर्व राज्यपाल हे उन्नत चेतनेचे शिरोमणी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. मात्र, राज्यात ही परंपरा न पाळता विशिष्ट विचारसरणी, तत्वज्ञान जाणीवपूर्वक जनतेसमोर ठेवले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. राज्यपालांनी आता महाराष्ट्राचा निरोप घ्यावा म्हणून त्यांना दख्खनचा काटेरी गुच्छ पाठवण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
निवेदनावर भ्रष्टाचारविरोधी जनांदोलनाचे कार्यकर्ते अशोक सब्बन, पीपल्स हेल्पलाईनचे ऍड. कारभारी गवळी, शाहीर कान्हू सुंबे, बबलू खोसला आदी उपस्थित होते.