मुंबई : सध्या विविध मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असतानाच आता त्यात आणखी एका चित्रपटाची भर पडली आहे. श्री कृपा प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘बाबू’ (Film Babu) हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून नुकतेच या चित्रपटाचे टिझर सोशल मीडियावर झळकले आहे. सुरुवातीपासूनच या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होती. त्यात आता टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आल्याने ‘बाबू’विषयीची उत्सुकता अधिकच शिगेला पोहोचली आहे. हा एक ॲक्शनपट असून यात ‘बाबू’ची भूमिका अंकित मोहन साकारत आहे. याव्यतिरिक्त या चित्रपटात रुचिरा जाधव, नेहा महाजन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. बाबू कृष्णा भोईर निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन मयूर मधुकर शिंदे (Mayur Shinde) यांनी केले आहे.
आगरी -कोळी भागात घडणारी ही कथा आहे.गावात होणाऱ्या अन्यायाविरोधात, राजकारणाविरोधात ‘बाबू’ त्याच्या आक्रमक पद्धतीने कशी उत्तरे देतो, हे पाहायला मिळत आहे. गावात नक्की कोणत्या कारणाने आपापसात ही लढाई सुरु आहे, हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल. मात्र यासाठी प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागेल. यापूर्वी अंकित मोहन ऐतिहासिक चित्रपटांमधून प्रेक्षकांसमोर आला आहे, या चित्रपटात मात्र अंकित एका वेगळ्याच भूमिकेत दिसत आहे. त्याच्या पिळदार शरीरयष्टीवरून त्याने घेतलेल्या मेहनतीचा चांगलाच अंदाज येतोय. यात रुचिरा आणि नेहाची नेमकी काय भूमिका आहे, हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे. या चित्रपटाची कथा बाबू कृष्णा भोईर(Babu Bhoir) यांची असून संवाद आणि पटकथा मयूर मधुकर शिंदे यांची आहे. ॲक्शनचा जबरदस्त धमाका ‘बाबू’च्या निमित्ताने पाहायला मिळणार आहे.