कुर्डुवाडी : कुर्डुवाडी शहर व परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, गेल्या दहा दिवसात कुर्डुवाडी शहर व परिसरात एकूण १८९ लोक बाधित झाले आहेत. त्यापैकी १०९ कुर्डुवाडीमधील आहेत. असे असलेतरी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.
नगरपालिका आणि ग्रामीण रुग्णालय यांच्या वतीने शहरात गेल्या दहा दिवसामध्ये केल्या गेलेल्या ६७० कोरोना टेस्टपैकी १८९ जण बाधित आढळले आहेत. त्यापैकी कुर्डुवाडीमधील १०९ व परिसरातील ८० जण बाधित आहेत. म्हणजे एकूण बाधितांपैकी ५८ टक्के बाधित हे कुर्डुवाडी शहरातील आहेत तर उर्वरित ४२ टक्के हे परिसरातील परिसरातील ग्रामीण भागातील आहेत. लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरु असल्याने कोणतीही गंभीर बाब निदर्शनास येत नाही. तरी नागरिकांनी गाफील न राहता ‘माझे शहर-माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ समजून घेऊन कोरोनाविषयक सर्व नियम अटी पाळून आपले दैनंदिन व्यवहार करावेत.
तसेच ज्यांचे लसीकरण अद्याप झाले नाही, अशा लोकांनी तात्काळ लसीकरण करुन घ्यावे. गरजेशिवाय घराच्या बाहेर पडू नये. सार्वजनिक कार्यक्रमात जाणे शक्यतो टाळावेत. लक्षणे आढळल्यास घाबरण्याची गरज नाही. मात्र, तात्काळ दवाखान्यात दाखवून डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावेत, असे आवाहन नगरपालिका आरोग्य निरीक्षक तुकाराम पायगण यांनी केले आहे.
माढा तालुक्यातील लसीकरण उद्दिष्ट २ लाख ५९ हजार ६२९ असून, त्यापैकी पहिला डोस झालेले २ लाख २३ हजार १९८ आहेत. तर दोन्ही डोस झालेले १ लाख ४७ हजार १८ लाभार्थी आहेत. किशोरवयीन १५ ते १८ वयोगटातील लसीकरण उद्दिष्ट हे १९ हजार २२२ असून त्यापैकी पहिला डोस घेतलेले ५ हजार ८३४ लाभार्थी आहेत.