फोटो सौजन्य- प्रतिनिधी
भगवान लोके/ कणकवली : हरकुळ बुद्रुक गावात वारंवार वीज प्रवाह खंडीत होत असल्यामुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्याबाबत तातडीने कार्यवाही करून विजेच्या समस्या सोडवाव्यात,अशी मागणी हरकुळ बुद्रुक ग्रामस्थांनी वीज वितरणचे उपविभागीय अभियंता विलास बगडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच समस्या न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे. वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना हे निवेदन देताना माजी पंचायत समिती सदस्य राजू पेडणेकर, माजी सभापती बाबासाहेब वरदेकर, इमरान शेख, निलेश तेली, सचिन तेली, रमाकांत तेली,मामा माणगावकर,नित्यानंद चिंदरकर,सरपंच बंडू ठाकूर ,चांद शेख आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
रात्री ८ ते सकाळी ९.३० पर्यंत वीज प्रवाह खंडीत होत असतो
या निवेदनात म्हटले आहे की,हरकुळ बुद्रुक गावात वारंवार विज प्रवाह खंडित होत असतो .त्यामुळे सप्टेंबर महिन्यामध्ये हरकुळ बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयामध्ये वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली होती. त्या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांनी यापुढे विजेची दुरुस्ती करण्यात येईल व गावामध्ये वारंवार वीज प्रवाह खंडित होणार नाही असे सांगितले होते. परंतु गेले पंधरा दिवस दररोज रात्री ८ ते सकाळी ९.३० पर्यंत काही ना काही कारणास्तव सतत वीज प्रवाह खंडीत होत आहे.
वीज वितरण अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना सुचना करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्याचा त्रास ग्रामस्थांना होतो. अनेकवेळा विजेचा पंप सुरू नसल्याने घरामध्ये पाण्या अभावी राहावे लागते. विजे अभावी मुलांना अभ्यास करता येत नाही. विजेवरील उपकरणे बंद पडतात. त्यामुळे सतत होणारा हा त्रास दूर करावा. अशी मागणी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनाद्वारे केलेली मागणी पूर्ण न झाल्यास ग्रामस्थांनी यासंबंधी आंदोलनाच इशारा दिला आहे.