पुणे : गणेशोत्सवाचा (Ganeshotsav) उत्साह सध्या महाराष्ट्रभर दिसून येत आहे. ठिकठिकाणी प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या गणरायांची मनोभावे पूजा केली जात असून गणेशभक्त हे भक्तीत तल्लीन झाले आहेत. मात्र या गणेशोत्सवाचा उत्साह हा केवळ महाराष्ट्र अथवा भारता पुरता मर्यादित नसून तो आता सातासमुद्रापार देखील पोहोचला आहे. मंगळवारी थायलंडवरून आलेल्या काही गणेशभक्तांनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती केली आहे.
दगडूशेठ हलवाई गणपती (Dagadusheth Halwai Ganpati) संस्थांतर्फे यंदा समाजातील विविध घटकांना गणरायाच्या आरतीचा मान देण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी तृतीयपंथीयांनी दगडूशेठ हलवाई गणपतीची मनोभावे आरती केली होती. तर आज मंगळवारी सकाळी थायलंडवरून आलेल्या गणेश भक्तांनी आरतीचा आनंद घेतला. यावेळी थायलंड वरून आलेल्या भक्तांनी चक्क मराठी भाषेतुन आरती म्हंटली. पारंपरिक भारतीय वेषभूषा करून ही सर्व मंडळी गणरायाच्या दर्शनासाठी आली होती.